Suraj Chavan New Home : बारामतीच्या सूरज चव्हाणने यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये प्रत्येकाचं मन जिंकलं. मोढवे गावचा हा सुपुत्र आता संपूर्ण महाराष्ट्राचा ‘गुलीगत किंग’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. सूरजने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यावर त्याला सुरुवातीला अनेक गोष्टी माहिती नव्हत्या. या सगळ्या गोष्टी त्याला पंढरीनाथ कांबळे, अंकिता वालावलकर, आर्या जाधव, अभिजीत सावंत या मंडळींनी हळुहळू शिकवल्या. यादरम्यान, आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा त्याने व्यक्त केली होती. आता शो संपल्यावर अवघ्या काही महिन्यांतच सूरजचं हे स्वप्न साकार होणार आहे.
सूरज चव्हाणने ( Suraj Chavan ) ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्यावर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवारांनी भेट घेण्यासाठी बोलावलं होतं. या भेटीदरम्यान त्यांनी सूरजला लवकरच घर देणार असं आश्वासन दिलं होतं. अजित पवारांनी शब्द दिल्याप्रमाणे नुकताच सूरजच्या नव्या घराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. याचा व्हिडीओ त्याने युट्यूबवर शेअर केला आहे. याशिवाय माध्यमांशी संवाद साधताना सूरजने याबद्दल अजित पवार यांचे आभार देखील मानले आहेत.
हेही वाचा : Video : अविनाश नारकरांनी दिवाळीसाठी केल्या सुबक करंज्या! पतीला फराळ करताना पाहून ऐश्वर्या म्हणाल्या, “कमाल…”
अजित पवार यांनी नुकताच बारामती विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सभेत भाषेत करताना सूरज चव्हाण ( Suraj Chavan ) व त्याच्या घराविषयी भाष्य केलं. अजित पवार सांगतात, “मोढवेसारख्या गावात राहून सूरजने शिक्षण पूर्ण केलं पाहिजे होतं पण, दुर्दैवाने त्याला ते करता आलं नाही. तो शाळेत गेला नाही पण, तो ‘बिग बॉस’मध्ये गेल्यावर प्रचंड लोकप्रिय झाला. त्याने ‘बिग बॉस’मध्ये जाऊन सर्वांवर बॉसगिरी दाखवली आणि तो या पर्वाचा विजेता झाला.”
“सूरजने हा शो जिंकला याकरता तमाम बारामतीकरांना, आपल्या जिल्ह्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा अभिमान वाटत आहे. सूरजचं प्रेम, त्याचा जिव्हाळा, आपुलकी पाहून मलाही समाधान वाटतं. आता आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यासाठी एक घर बांधायचं ठरलंय. त्याला नव्या घराचा प्लॅन देखील आवडलाय. आता येत्या वर्षभरात म्हणजेत बघा आज दिवाळीचा पहिला दिवस आहे…आता पुढच्या वर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी सूरज तू नव्या घरात प्रवेश करायचा. हा माझा वादा आहे. दादांचा शब्द किती खरा असतो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.” असं अजित पवार यांनी या सभेत सांगितलं.
सुरज, तु पुढच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवीन घरात प्रवेश करशील, हा माझा वादा आहे… अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मी माझा शब्द मोडत नसतो..!#BaramatiCheDada pic.twitter.com/2nDPXC4dP5
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 28, 2024
सूरजने मानले अजित पवारांचे आभार
नव्या घराचा भूमिपूजन सोहळा पार पडल्यावर सूरज चव्हाण ( Suraj Chavan ) माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला, “घराचं स्वप्न पूर्ण होतंय याचा प्रचंड आनंद झालाय. मला खूप बरं वाटतंय. दादांनी ( अजित पवार ) माझं हे घराचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. दादांनी मला दसऱ्याला घराबद्दल सांगितलं होतं आणि आज मी माझ्या हस्ते भूमिपूजन केलं. खूप बरं वाटतंय. दादांनी गरीबाच्या पोराला मदत केली यासाठी त्यांचा मी खूप आभारी आहे.”