मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची (Surekha Kudachi) यांनी अनेक मराठी चित्रपट व मालिकांत काम करीत आजपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘आई शक्तिदेवता’, ‘चंद्रकला’, ‘आजोबा वयात आले’, ‘घुसमट’, ‘अग्निपरीक्षा’, ‘दुर्गा म्हणतात मला’, ‘फॉरेनची पाटलीण’, ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. सध्या त्या मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे.
तीन महिने मी कोणाशीही बोलत…
सुरेखा कुडची यांनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या व्यावसायिक, तसेच वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत खुलासे केले. तसेच, पतीचे निधन झाल्यानंतर एकटीने मुलीचा सांभाळ करणे, तसेच दुसऱ्या लग्नाचा विचार मनात आला नाही का? यावरही त्यांनी वक्तव्य केले. पतीच्या निधनानंतर आलेल्या जबाबदाऱ्या, पुन्हा स्वत:च्या पायावर उभं राहायचं, मुलीला एकटीनं सांभाळणं, तर तेव्हा त्या खचल्या होत्या का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुरेखा कुडची म्हणाल्या, “हो, मी खचले होते. त्याही वेळेला मी माझ्या पायावर उभी होतेच. पतीचं निधन झाल्यानंतर मला असं वाटलं की, सगळं संपलं आहे. मी एकटी आहे आणि मुलगी तीन वर्षांची होती. मी हिला कसं वाढवणार, असा प्रश्न पडला होता. माझा बँक बॅलन्स नव्हता, माझं स्वत:चं घर नव्हतं, असं नाही. माझ्याकडे सगळं सेट होतं. तरीसुद्धा त्या काळात माझ्या मनात हे प्रश्न निर्माण झाले होते. तीन महिने मी कोणाशीही बोलत नव्हते. मी कोणाच्याही संपर्कात नव्हते. सासू म्हणाली की, तू अशीच बसून राहिलीस, तर तुला वेड लागेल. सुरेखा, तू काम कर. मला तिचा खूप पाठिंबा होता.
“माझं सासर खूप फिल्मी आहे. सासरे कॅमेरामॅन होते. ते यश चोप्रांकडे असिस्टंट होते. माझ्या सासरचा मला पूर्ण पाठिंबा होता. माझ्या मुलगी साडेचार-पाच वर्षांची होईपर्यंत माझ्या सासूनं तिला छान सांभाळलं. तीन महिन्यांनंतर मी कामाला सुरुवात केली. तेव्हा भाग्यलक्ष्मी या मालिकेत काम केले. पर्यायच नव्हता. मी काम करत नसते, तर खूप बिकट परिस्थिती झाली असती. आताच माझ्या मुलीची दहावी झाली. अजून तिचं पुढचं शिक्षण आहे. तर मला असं वाटतं की, अजून काम करायचं आहे. स्वामींपुढे एकच प्रार्थना कायम करते की, आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात भरपूर दु:खं पाहिली आहेत, अजूनही काही असतील, तर ती माझ्या वाट्याला दे. पण, माझ्या मुलीचं आयुष्य सुरळीत आणि छान होऊ दे. तिचं शिक्षण, नोकरी व लग्न झाल्यानंतर तू मला बोलव, काही हरकत नाही. पण, तोपर्यंत आजी-पणजीपर्यंतच्या भूमिका मला करायच्या आहेत. माझे हात-पाय चालवायचे आहेत.”
आयुष्यात स्वत:ला दुसरा चान्स देऊयात, हा विचार कधी आला नाही का? त्यावर उत्तर देताना सुरेखा कुडची म्हणाल्या, “मला असं वाटण्यापेक्षा माझ्या घरच्यांनी मला तसं सुचवलं होतं. त्याच वेळेला त्यांनी मला मुलगी लहान आहे तोपर्यंत लग्न कर, असं म्हटलं होतं. माझं वय तेव्हा ३७-३८ वर्षं होतं. सासूनंदेखील पाठिंबा दिला होता. काहीच हरकत नाही, असं ती म्हणाली होती. पण, त्यावेळी मी मानसिकदृष्ट्या या सगळ्यासाठी तयार नव्हते. मला लग्न करायचं नाही, असं मला वाटत होतं. दोन वर्षांनंतर एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. मला एक व्यक्ती आवडली. आम्ही छान बोलायचो, भेटायचो. कुठेतरी जाऊन असं वाटायला लागलं की, बाईला पुरुष भेटतो; पण मुलीला वडील भेटत नाहीत. मग माझ्या आयुष्यात येणारी व्यक्ती माझ्या मुलीला तसंच स्वीकारेल का? असं वाटायला लागलं. फक्त माझ्यासाठी नाही. असं असेल तर मी कोणाबरोबरही रिलेशनमध्ये राहू शकते; पण मला तसं नको होतं. मग सगळ्या गोष्टी तिथेच थांबवल्या. हे कळून चुकलं होतं की, आपल्याला पुरुष मिळतो; पण मुलीला बाप मिळणार नाही. त्यामुळे नको, असा विचार केला”, असे म्हणत सुरेखा कुडचींनी दुसरे लग्न का केले नाही, ते स्पष्ट केले आहे.