सोशल मीडियावर प्रेक्षक त्यांना वाटणाऱ्या गोष्टींवर खुलेपणाने व्यक्त होत असतात. टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका, बिग बॉससारखे शो, चित्रपट, गाणी अशा अनेकविध गोष्टींवर प्रेक्षक सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. प्रेक्षकांकडून जसे आवडलेल्या गोष्टींचे कौतुक केले जाते, तसेच न आवडलेल्या गोष्टींवर त्यांच्याकडून टीकाही केली जाते. मात्र, अनेकदा एखाद्या व्यक्तीला ट्रोल करण्यासारखे प्रकारही घडतात. आता अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी जेव्हा त्या बिग बॉस घरातून बाहेर आल्या होत्या, त्यावेळची आठवण त्यांनी सांगितली आहे.
काय म्हणाल्या सुरेखा कुडची?
अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी नुकतीच ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील सदस्यांच्या खेळावर वक्तव्य केले आहे. निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण अशा सगळ्यांच्या खेळावर त्यांनी आपले मत मांडले आहे. त्याबरोबरच त्या ज्या पर्वात बिग बॉसच्या शोमध्ये गेल्या होत्या, त्या सीझनमध्ये सोनाली आणि त्यांच्यामध्ये वाद होते; पण सोनाली कधीही त्यांच्याशी वाईट शब्दांत बोलली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
जेव्हा स्पर्धकांबद्दल वाईट बोलले जाते, ट्रोल केले जाते, त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक यांच्यावर काय परिणाम होतो, या प्रश्नावर उत्तर देताना सुरेखा कुडची यांनी म्हटले, “मी जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले होते, त्यावेळी समजलं की, चहा-चपातीवरून मला ट्रोल केलं गेलं आहे. मी माझ्या घरी गेले त्यावेळी माझ्या बहिणीनं मला सांगितलं की, तू आधी मोबाईल बघ. लोकांनी तुला खूप ट्रोल केलंय. मी काही एपिसोड बघितले आणि त्यानंतर त्याखालच्या कमेंट्सही वाचल्या. जसं मी वाचत गेले, तसतशी एका पॉईंटला मला माझी स्वत:चीच लाज वाटू लागली. मला वाटलं की हे काय? लोक माझ्याबद्दल असं का लिहीत आहेत? लोकाचं म्हणणं होतं की, तुला खायचं होतं, तर तू बनवायचं होतंस आणि खायचं होतंस. मी बनवलं; फक्त ते टेलिकास्ट नाही झालं. मग लोकांना काय दिसणार आहे? लोक बोलत गेले. माझे घरचेसुद्धा म्हटले, हे लोक असं कसं लिहीत आहेत तुझ्याबद्दल?”
हेही वाचा: सई लोकूरने पहिल्यांदाच दाखवला लाडक्या लेकीचा चेहरा! फोटो शेअर करत म्हणाली, “आज आई म्हणून…”
पुढे बोलताना त्या म्हणतात, “घरचे फिल्मी नसतात. मी बिग बॉसच्या घरात जातानाही त्यांना सांगून गेले होते. लोक काहीही लिहितील. कारण- त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे तुमच्या मुलीला चांगलंच बोलतील, असं नाही. चांगलं-वाईट दोन्ही बोलतील तशी तुम्ही मनाची तयारी ठेवा. हे एवढं माहीत असूनसुद्धा जेव्हा लोकांनी माझ्याबद्दल लिहिलेलं वाचलं, पाहिलं तेव्हा सुरुवातीचे दोन-चार दिवस मी हलले होते. अनेकांनी लिहिलं होतं की, आतापर्यंत तुम्ही ज्या खाष्ट सासूच्या भूमिका केल्या होत्या, त्या आम्हाला आवडल्या; पण बिग बॉसमुळे आम्हाला कळलं की, खऱ्या आयुष्यातसुद्धा तुम्ही तेवढ्यात खाष्ट आहात. असे कसे लिहितात माझ्याबद्दल? असं वाटलं होतं. मला कळलंच नाही, मी असं काय वागले होते?”
दरम्यान, अभिनेत्री सुरेखा कुडची बिग बॉस मराठी ५ व्या पर्वातील सदस्यांच्या खेळावर सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. पंढरीनाथ कांबळेंना जान्हवीने ‘जोकर’ म्हटल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर केली होती; ज्याची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते.