मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियूष रानडे यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत दोघांनी ही आनंदाची बातमी दिली. जवळचे मित्र व नातेवाइकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. लग्नादरम्यानचे दोघांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. सुरुची आणि पियूष यांच्या लग्नानंतर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
पियूष व सुरुची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. लग्नानंतर सुरुची व पियूष एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून दोघेही फिरायलादेखील गेले होते. दरम्यान, पियूष व सुरुची यांच्या लग्नाला नुकतेच तीन महिने पूर्ण झाले आहेत. या खास दिवसानिमित्त दोघे एका रोमँटिक डेटवर गेले आहेत. सुरुचीने आपल्या इन्स्टाग्रामवर या डेटचा फोटो शेअर केला आहे. दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये डिनरला गेलेले बघायला मिळत आहेत. यावेळी पियूषने सुरुचीसाठी ‘Happy 3 Month Darling’, असे लिहिलेला एक खास केकही ऑर्डर केला होता. या केकचा फोटो शेअर करीत, सुरुचीने “जेव्हा तुमचा नवरा तुम्हाला असं खास सरप्राइज देतो”, अशी कॅप्शन दिली आहे.
याअगोदरही पियूषने सुरुचीला अनेकदा अशा प्रकारचे सरप्राइज दिले आहे. लग्नाच्या काही दिवसांनंतरच पियूषने खास सुरुचीसाठी डोसा बनवला होता. सुरुचीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत ही माहिती दिली होती. अभिनेत्याबरोबर पीयूष एक उत्तम शेफही आहे. सुरुचीने अनेक मुलाखतींमध्ये याबाबतचा खुलासाही केला होता.
सुरुची व पियूषच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ‘का रे दुरावा’ मालिकेतून सुरुची घराघरांत पोहोचली. ‘अवघाची संसार’, ‘ओळख’, ‘एक तास भुताचा’, ‘आपलं बुवा’ या मालिकांमधील तिची भूमिका चांगलीच गाजली; तर पियूषनेही आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील त्याच्या भूमिकेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या तो ‘काव्यांजली’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे; तर सुरुची सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत झळकत आहे.