मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडेने नुकतीच लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुरुचीने ही आनंदाची बातमी दिली. सुरुचीने लग्नादरम्यानचे काही फोटोही पोस्ट केले होते. सुरुची आणि पियुष यांच्या लग्नानंतर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सुरुची व पियुषच्या मेहंदीपासून लग्नापर्यंतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये ही जोडी खूप सुंदर दिसत होती. लग्नात सुरुची व पियुषच्या पारंपरिक लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले होते. लग्नात सुरुचीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती, तर पियुषनेही तिला मॅचिंग कुर्ता व धोतर परिधान केले होते. अभिनेत्रीचं सासरीसुद्धा मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. लग्नानंतर सुरुची व पियुषने जोडीने सत्यनारायणाची पूजा केली. सुरुचीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या पूजेचा फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, सुरुची अडारकरचे हे पहिलं लग्न आहे, तर पियुष रानडेचे हे तिसरे लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री शाल्मली टोळ्येशी लग्नगाठ बांधली होती, मात्र हे लग्न जास्त काळ टिकले नाही. त्यानंतर तो अभिनेत्री मयुरी वाघ बरोबर लग्नबंधनात अडकला होता. मात्र, लग्नाच्या काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.
सुरुची व पियुषच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘का रे दुरावा’ मालिकेतून सुरुची घराघरांत पोहचली. ‘अवघाची संसार’, ‘ओळख’, ‘एक तास भुताचा’, ‘आपलं बुवा’ मालिकांमधील तिची भूमिका चांगलीच गाजली; तर पियुषनेही आत्तापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील त्याच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या तो ‘काव्यांजली’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.