Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : ‘का रे दुरावा’ या मालिकेतून अभिनेत्री सुरुची अडारकर घराघरांत लोकप्रिय झाली. ६ डिसेंबर २०२३ मध्ये तिने पियुष रानडेशी लग्नगाठ बांधली. अभिनेत्याचं हे तिसरं लग्न असल्याने विवाहसोहळ्यातील फोटो शेअर केल्यावर या दोघांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर सुरुचीने पहिल्यांदाच लग्न, ट्रोलिंग यावर भाष्य केलं आहे. ती नेमकं काय म्हणालीये सविस्तरपणे जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरुची ‘रेडिओ सिटी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “हो मला माहिती होतं की, हे सगळं होणार कारण… आजपर्यंत पियुष माणूस म्हणून कोणापर्यंत पोहोचलेलाच नाहीये. तो फार बोलतच नाही. आमच्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा मला त्याच्याशी खूप गोष्टी स्वतःहून बोलाव्या लागायच्या. सुरुवातीला मी स्वतःहून त्याच्याशी संवाद साधायचे. त्याला मी बोलायची सवय लावली. तो फार नाही बोलायचा… तो आधीच लोकांपर्यंत पोहोचलेला नव्हता, त्यात आताचे लोक तसेही जजमेंटल (एखाद्याबद्दल आधीच आपलं मत बनवणं) झाले आहेत. पण, आमच्या दोघांमध्ये कोणीतरी खंबीर राहणं हे खूप जास्त महत्त्वाचं होतं आणि मी खंबीर आहे याची मला कल्पना होती. मला माझ्या निर्णयांवर विश्वास असतो कारण, मी एखादी गोष्ट केल्यानंतर विचार नाही करत…ती गोष्ट करण्याआधीच त्याचा विचार करते. मी लग्नाचा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला होता.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “आजकाल आपण कोणलाही पाहून एखादी गोष्ट सहज बोलून जातो की, हे असं कसं झालं. पण, लोक जे बोलत होते ते आयुष्य आम्ही जगतोय याचा अर्थ आम्ही त्या गोष्टीचा सारासार विचार करुनच निर्णय घेतलेला आहे. मी सगळा विचार करुनच त्या माणसाला स्वीकारलंय. माणूस म्हणून जर तो चुकीचा असता तर, त्याच्याबरोबर कोणी का राहिलं असतं? तो जसा आहे तसं मी त्याला स्वीकारलं होतं. जर त्याच्या आयुष्यात ते घडलंय तर, त्याची झळ त्यालाच जास्त बसलीये. मला त्याच्या कोणत्याच गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण भूतकाळ हा भूतकाळच असतो. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये एका कोणाची चूक आहे हे नसतंच… हे सगळं तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. अनेकदा दोघंही खूप चांगली असतात पण, त्यांचं एकमेकांशी नाही पटत मग, त्यांनी अट्टाहासाने का एकत्र राहावं? फक्त समाजात माहितीये म्हणून पटत नसून एकत्र राहणं हे गरजेचं नाहीये. मला असं वाटतं की, ते लोक पण खूप सक्षम आहेत जे त्या परिस्थितीत वेगळं होण्याचा विचार करतात. नाहीतर अनेक जोडप्यांना काही वर्षांनी या गोष्टी समजतात की, अरे आपण फक्त मुलासाठी एकत्र राहिलो, समाजासाठी एकत्र आहोत. आपण आयुष्य जगलोय का? तर नाही जगलो. मग एकमेकांना त्रास न देता तुम्ही वेळीच जेव्हा बाजूला होता तेव्हा तो निर्णय खूप मोठा असतो. त्यामुळे मी त्याचं सगळं स्वीकारलं.”

सुरुची ट्रोलिंगबद्दल काय म्हणाली?

ट्रोलिंगबद्दल मत मांडताना सुरुची म्हणाली, “मला माहिती होतं की, लोक हे सगळं बोलणार… त्यामुळे लग्नाचे शेअर करताना आम्ही खूप विचार केला होता की काय करायचं? कारण आम्ही या बद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं. याची चर्चा मला होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे लग्नाच्या दिवशी फोटो शेअर करायचे असं आम्ही ठरवलं. कारण, आमच्या आयुष्यातली एवढी महत्त्वाची घटना आम्हाला चुकीच्या मार्गाने लोकांसमोर आणायची नव्हती. ती गोष्ट आदरपूर्वकच सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण कसं होतं, लोकांना बाहेरून कळतं आणि मग चर्चा होते… त्यापेक्षा मग आम्हीच सांगितलं. खूप लोक बरंच काय-काय बोलले. आजही अनेक लोक बोलतात पण, इंडस्ट्रीतून आम्हाला खरंच चांगले फोन आले. त्यात माझ्या आई-वडिलांचा खूप मोठा पाठिंबा मला होता. त्यात मी सुद्धा भयंकर खंबीर आहे. तुम्हाला बोलायचंय हे तुमचं मत आहे बोला… मला कोणासमोर काहीच सिद्ध करायचं नाही.”

“काही कमेंट्स मी वाचल्या, त्यानंतर माझं असं झालं ठिके हे तुमचं मत आहे मग, मी या सगळ्याचा आम्हा दोघांनाही त्रास होऊ दिला नाही. आपलं आयुष्य ज्यांना आपण कधी भेटलोच नाही त्यांना का खराब करु द्यायचं? नवीन पेज सुरू करून, डीपी वेगळा ठेवून ट्रोल केलंय… ज्यांच्यात माझ्यासमोर बोलायची हिंमत नाहीये. त्यांना मी का उत्तर देऊ? सर्वांकडे दुर्लक्ष करून आम्ही आयुष्यात पुढे आलोय.” असं सुरुची अडारकरने यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suruchi adarkar talks about her marriage with piyush ranade and reacts on trolling sva 00