भाजपा आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांची नावं घेतली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्राजक्ताने मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होणं चुकीचं आहे त्यामुळे सुरेश धस यांनी माफी मागावी, अशी मागणी तिने केली. याशिवाय अभिनेत्रीने रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब भेट घेऊन तक्रारीचं निवेदन सादर केलं आहे. याप्रकरणी मनोरंजन कलाविश्वातील कलाकार सुद्धा प्राजक्ताला पाठिंबा देण्यासाठी एकटवले आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, कुशल बद्रिके, मेघा धाडे, विशाखा सुभेदार या कलाकारांनी प्राजक्ताला पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या. आता याप्रकरणी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत चारुहासची भूमिका साकारणारे अभिनेते स्वप्नील राजशेखर आणि सुशांत शेलार यांनी देखील भाष्य केलं आहे.
स्वप्नील राजशेखर लिहितात, “सत्ताकारणात स्त्रीचा आणि तिच्या तथाकथित चारित्र्याचा सहजी बळी देणं हे पूर्वापार आहे… बरं लिखत पढत ना रसीद ना खाता… सारी बात हवाई…” त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तसेच अभिनेता सुशांत शेलार या प्रकरणी पोस्ट शेअर करत लिहितो, “नमस्कार, कालपासून सगळ्या न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावरती एका वाचाळवीराकडून महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबद्दल जी खालच्या पातळीची टीका होत आहे, त्याचा मी कठोर शब्दांत निषेध करतो. अशा पद्धतीने कुठल्याही महिला कलाकाराला राजकारणात खेचून खालच्या पातळीवर टीका करणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा काही वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण दुषित झालं आहे. त्यांना वेळीच आळा घातला पाहिजे. मी एक कलाकार म्हणून प्राजक्ता माळी यांच्या बरोबर आहे.”
दरम्यान, या प्रकरणी प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने एक्स पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेत्रीला आश्वस्त केले आहे.