Charu Asopa Viral Video: टीव्ही अभिनेत्री चारू असोपा सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. चारूने बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन याच्याशी २०१९ मध्ये लग्न केलं होतं. पण २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. चारू व राजीव यांना झियाना नावाची एक मुलगी असून तिचा सांभाळ चारू करते.

चारू तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आली आहे. व्हिडीओमध्ये ती ऑनलाइन कपडे विकताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चारूने स्पष्टीकरण दिलं. तसेच मुंबई सोडल्याचा खुलासा केला आहे.

ऑनलाइन कपडे विकतेय चारू

इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात चारू असोपा एक फ्लोरल प्रिंटेड ड्रेस घालून दिसतेय. तसेच तिच्या हातात बांधणी प्रिंटचे कपडे आहेत आणि ती त्या कपड्यांबद्दल माहिती देताना दिसतेय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोक तिचं कौतुक करत आहेत.

‘चारू तुझा अभिमान वाटतो,’ ‘घटस्फोट झाला म्हणून काय झालं, चांगलं काम करतेय,’ ‘चारू काम करून घर चालवतेय ही खूप चांगली गोष्ट आहे,’ अशा कमेंट्स चारूच्या या व्हिडीओवर लोक करत आहेत.

चारूने मुंबई शहर सोडले

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर चारूने हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितलं की ती ऑनलाइन कपडे विकते. मुंबई सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याचं चारूने नमूद केलं. “मी माझं मूळ शहर बीकानेर, राजस्थान येथे शिफ्ट झाली आहे. मी मुंबई सोडली आहे आणि आता माझ्या आई-वडिलांबरोबर राहत आहे. मला व झियानाला इथे येऊन एक महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत,” असं चारू म्हणाली.

मुंबईत राहणं सोपं नाही – चारू असोपा

पुढे चारू म्हणाली, “मुंबईत राहणं अजिबात सोपं नाही. खूप पैसे लागतात. माझा एका महिन्याचा खर्च एक ते दीड लाख रुपये होता. यात घराचं भाडं आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. तसेच जेव्हा मी मुंबईतील नायगावात शूटिंगला जायचे, तेव्हा मला झियानाला नॅनीबरोबर एकटं सोडावं लागत होतं. माझ्यासाठी मुलीला सोडून जाणं खूप अवघड होतं.”

चारूने राजीव सेनला मेसेज करून कळवलं

“घरी परत यायचं आणि काम करायचं हे मी आधीच ठरवलं होतं. हा निर्णय मी घाईत घेतलेला नाही,” असं चारूने स्पष्ट केलं. तसेच मुंबई सोडण्याआधी पूर्वाश्रमीचा पती राजीव सेनला एक मेसेज करून निर्णयाबद्दल सांगितलं होतं. तो बीकानेरला मुलीला भेटायला केव्हाही येऊ शकतो, असंही चारूने सांगितलं.