काही मालिका या वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. त्यातील एक मालिका म्हणजेच ‘दिल दोस्ती दुनियादारी'(Dil Dosti Duniyadari) ही आहे. २०१५ साली प्रदर्शित झालेली ही मालिका जवळजवळ वर्षभर प्रेक्षकांचे मनोरंजन करीत होती. सहा मित्रांची ही गोष्ट प्रेक्षकांना भावली. रेश्मा, सुजय, मीनल, अ‍ॅना, कैवल्य व आशू या मित्रांची एक वेगळी गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्यांच्या निखळ मैत्रीने प्रेक्षकांची मने जिंकली. आता हे कलाकार विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. मात्र, आजही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग असल्याचे दिसते. आता एका मुलाखतीत सुजयची भूमिका साकारणारा अभिनेता सुव्रत जोशी (Suvrat Joshi)ने या मालिकेबद्दल, तसेच सहकलाकरांच्या बॉण्डिंगबद्दल वक्तव्य केले आहे.

मी जे कमावलंय…

अभिनेता सुव्रत जोशीने नुकतीच ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने आजही ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या सहकलाकारांमध्ये चांगले बॉण्डिंग असल्याचे वक्तव्य केले. सुव्रत जोशी म्हणाला, “आम्ही सगळे सहा जण भेटणं अवघड झालं आहे. कारण-सगळे कामात व्यग्र आहोत. पण, तरीसुद्धा जेव्हा जेव्हा शक्य होईल, तेव्हा तेव्हा आम्ही तिघांच्या वा चौघांच्या गटात भेटत असतो. ‘वरवरचे वधू-वर’मध्ये अमेय नाही; पण फोटो स्टुडिओ चालू असेपर्यंत पूजा, मी, सखी, अमेय एकत्र नाटकच करत होतो. पण पुष्कराजही अनेकदा भेटतो. स्वानंदी व मी एक हिंदी नाटक एकत्र केलंय. त्यादरम्यान आम्ही एकत्र होतो. त्यामुळे सगळे सहा जण एकत्र भेटणं होत नसलं तरी दोन-तीनच्या गटात भेटत असतो. पण, आमच्यात असं एक बॉण्डिंग आहे.”

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेविषयी सुव्रत म्हणाला, “टेलिव्हिजनची चांगली बाजू अशी आहे की, तुम्हाला रोज कॅमेऱ्यासमोर उभं राहायला मिळतं. सुदैवानं किंवा दुर्दैवानं एखादा एपिसोड तुम्ही केलात, तर लगेच दुसऱ्या दिवशी नवा एपिसोड आलेला असतो. त्यामुळे समजा, काल तुम्ही चुकलात, तर लगेच चुका सुधारून दुसऱ्या दिवशी नव्यानं गोष्टी करून बघता येतात. म्हणून खरं तर मी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेला हो म्हणालो होतो. इतका साधा हेतू होता. मी एक शिकलेला नट आहे. मला असं वाटतं की, मी जे कमावलंय, ते कष्ट करून कमावलंय. माझ्याकडे प्रतिभा वगैरे आहे, असं मला काही वाटत नाही. त्यामुळे मला असं वाटलं की, जितका सराव करेन, तितका मी चांगला होईन. आम्ही भाग्यवान होतो की, खूप चांगले लेखक, खूप चांगले दिग्दर्शक आम्हाला लाभले. ज्या वाहिनीवर ही मालिका दाखविली गेली, त्यांचाही खूप चांगल्या पद्धतीने पाठिंबा होता. खूप चांगले सहकलाकार होते. त्यातील एक सहकलाकार माझी पत्नी आहे. बाकी सगळे जणही अतिशय जीवश्चकंठश्च मित्र आहेत. तर, खऱ्या आयुष्यातही आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आजही लोक ती मालिका बघतात.”

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत सुव्रत जोशीने सुजय ही भूमिका साकारली होती. रेश्मा ही भूमिका सखी गोखलेने साकारली होती. अ‍ॅनाच्या भूमिकेत अभिनेत्री पूजा ठोंबरे दिसली होती. पुष्कराज चिरपुटकरने आशू ही भूमिका साकारली होती. कैवल्यच्या भूमिकेत अभिनेता अमेय वाघ दिसला होता. तर, स्वानंदी टिकेकरने मीनल ही भूमिका साकारली होती. आता हे कलाकार विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.