कलाकारांचे आयुष्य हे नेहमीच संघर्षपूर्ण असतं. एखादे काम मिळवण्यासाठी कलाकारांना अनेक प्रयत्न करावे लागतात. शिवाय नशिबाने एखादे काम मिळाले तरी ते टिकवण्यासाठीचाही एक वेगळाच संघर्ष असतो. अशातच गेल्या काही काळापासून इंडस्ट्रीत एक नवीन प्रकार उदयास आला आहे, तो म्हणजे सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून कलाकाराची एखाद्या भूमिकेसाठी निवड करणे. याबद्दल अनेक कलाकारांनी भाष्य केलं आहे. तसंच सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून एखाद्या भूमिकेसाठी निवड होणे याबद्दल स्पष्ट शब्दांत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच अभिनेता सुयश टिळकनेदेखील (Suyash Tilak) नुकतंच यावर भाष्य केलं आहे. सुयशने नुकतीच ‘झेन एंटरटेनमेंट’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून कास्टिंग होत असल्याबद्दल स्पष्ट शब्दांत आपली बाजू मांडली.
“फॉलोअर्स नाहीत म्हणजे मी कलाकार नाही का?”, सुयशचं स्पष्ट मत
याबद्दल सुयश (Suyash Tilak) असं म्हणाला की, “कास्टिंग करताना हे बघितलं जातं की, तुमचे सोशल मीडियावर फॉलोअर्स किती आहेत. फोन येतात की, तुमचं नाव शॉर्ट लिस्ट झालं आहे. पण तुमची सोशल मीडियाची लिंक पाठवा. तुमचे फॉलोअर्स किती आहेत ते बघायचं आहे. यावर माझं असं होतं की, नाहीयेत फॉलोअर्स माझ्याकडे, शून्य फॉलोअर्स आहेत, मग काय करणार? माझ्याकडे फॉलोअर्स नाहीत म्हणजे मी कलाकार नाही का? सोशल मीडियावर माझे फॉलोअर्स असतील आणि तरच मला कलाकार म्हणून काही तरी स्थान आहे हे समीकरण खूप समस्यात्मक आहे आणि धोकादायक आहे. असा पायंडा पडत असेल तर तेही खूप समस्यात्मकच आहे.”
“प्रसिद्ध आणि फॉलोअर्स जास्त असणाऱ्या मुलींना प्राधान्य”
यापुढे सुयशने (Suyash Tilak) असं म्हटलं की, “मी हे मालिकांच्या बाबतीत बरेचदा बघतो. विशेषत: मुलींच्या बाबतीत. नवीन चेहरे लॉन्च करायची जेव्हा वेळे येते तेव्हा सोशल मीडियावर प्रसिद्ध असणाऱ्या आणि फॉलोअर्स जास्त असणाऱ्या मुलींना प्राधान्य दिलं जातं. पण मग कॅमेऱ्यासमोर उभं राहिल्यानंतर १०-१२ टेक होतात. सगळे कलाकार आणि सगळे तंत्रज्ञ टेकसाठी थांबलेले असतात. मग कुठे तरी महिन्याभराने त्यांना जाणवतं की, आपण फारच चूक केली. काही घडतच नाही आणि मग तिथे एक नवीन चेहरा येतो”.
सुयश टिळकच्या कामाबद्दल…
दरम्यान, सुयश टिळक (Suyash Tilak) हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘का रे दुरावा’ (Ka Re Duarava) मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुयशने अनेक नाटक व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकांना प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतलं आहे. सध्या त्याचे अभिनेत्री सुरूची अडारकरबरोबर ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे. प्रेक्षकांकडून या नाटकाला तूफान प्रतिसाद मिळत आहे.