‘स्वाभिमान’ या स्टार प्रवाहवरील मालिकेने गेल्यावर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर पुढे २ वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकेतील पल्लवी-शंतनुची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. गेल्यावर्षी ६ मे रोजी ‘स्वाभिमान’ मालिकेचा अखेरचा भाग प्रदर्शित करण्यात आला होता.
‘स्वाभिमान’ मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पूजा बिरारी, अक्षर कोठारी, अस्मिता कुलकर्णी, आसावरी जोशी, अशोक शिंदे, सविता प्रभुणे, अपूर्वा परांजपे या कलाकारांनी मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मालिकेने निरोप घेतल्यावर आता यामधील बहुतांश कलाकार नव्या प्रोजेक्टमध्ये झळकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
‘स्वाभिमान’, ‘जाऊ नको दूर बाबा’ या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री अपूर्वा परांजपे आता कलर्स मराठीच्या ‘काव्यांजली’ या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेणार आहे. ‘सखी सावली-काव्यांजली’ मालिकेत आता सानिका काशीकर ऐवजी अपूर्वा परांजपे ‘श्रेष्ठा’ या खलनायिकेची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा : “हिचं शरीर कृत्रिम, कॉस्मेटिक सर्जरी…”, माधवी निमकरने सांगितला अनुभव; म्हणाली, “अशा कमेंट्स…”
‘काव्यांजली’ मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये प्रेक्षकांना श्रेष्ठा ही खलनायिका आता अपूर्वा परांजपेच्या रुपात पाहायला मिळत आहे. दरम्यान, अपूर्वाचे मनोरंजनसृष्टीतील मित्रमंडळी आणि तिच्या चाहत्यांनी नव्या मालिकेसाठी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, ‘काव्यांजली’ ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री साडेआठ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित करण्यात येते.