मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे पूजा सावंत-सिद्धेश चव्हाण यांच्या लग्नाची चर्चा चालू असताना आता एका अभिनेत्रीच्या लग्न सोहळ्यातील फोटो व्हायरल झाले आहेत. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली. सध्या मराठी कलाविश्वातून या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ही अभिनेत्री कोण आहे जाणून घेऊयात…
मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता आंबुर्लेला ओळखलं जातं. सध्या ती सोनी मराठी वाहिनीवरील ‘राणी मी होणार’ या मालिकेत नेहा हे प्रात्र साकारत आहे. याशिवाय स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘स्वाभिमान’ या मालिकेत देखील तिने काम केलं आहे. यामध्ये तिने जानकीची भूमिका साकारली होती.
हेही वाचा : साखरपुड्यानंतर होणाऱ्या बायकोसह प्रथमेश परब पोहोचला कोकणात! सासरी श्रीवर्धनला ‘असं’ झालं जावयाचं स्वागत
प्राजक्ता आंबुर्लेने लग्न लागताना दागदागिने, हातात हिरवा चुडा आणि याचबरोबर पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. मराठी कलाविश्वातून प्राजक्ताच्या जवळच्या अशा बऱ्याच मैत्रिणींनी या जोडप्याच्या लग्नाला खास उपस्थिती लावली होती. प्राजक्ताच्या नवऱ्याचं नाव प्रथमेश कर्णेकर असून तो व्यावसायिक आहे.
हेही वाचा : ‘दंगल’ फेम सुहानी भटनागरचं निधन, वडिलांनी दिली दुर्मिळ आजाराची माहिती; म्हणाले, “दोन महिन्यांपूर्वी…”
दरम्यान, प्राजक्ता आंबुर्लेच्या लग्नाला ‘सहकुटुंब सहपरिवार फेम साक्षी गांधी, ‘रमा राघव’ फेम प्रियांका देशमुख यांनी खास उपस्थिती लावली होती. याशिवाय सध्या कलाविश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.