Indrayani Serial: ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेचा १० मार्चपासून नवा अध्याय सुरू होणार आहे. निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ अशा छोट्या इंदूचा प्रवास संपणार असून आता मोठी इंदू नव्या आव्हानांना सामोरे जाताना दिसणार आहे. अभिनेत्री कांची शिंदे मोठ्या इंद्रायणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसंच मोठ्या गोपाळच्या भूमिकेत ‘कलर्स मराठी’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार आहे. तो कोण आहे? जाणून घ्या…

‘इंद्रायणी’ मालिका ही ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील सध्याच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील चिमुकल्या इंदूने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बालकलाकार सांची भोईरने आपल्या सहजसुंदर अभिनयाने छोटी इंदू साकारली होती. पण, आता लवकरच मोठी इंदू प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या लोकप्रिय मालिकेत झळकलेली कांची शिंदे मोठ्या इंदूच्या भूमिका साकारणार आहे. तर मोठ्या अधूच्या भूमिकेत अभिनेता निशांत पवार दिसणार आहे. तसंच मोठ्या गोपाळच्या भूमिकेत ‘कलर्स मराठी’ची जुनी मालिका ‘स्वामिनी’मधील अभिनेता पाहायला मिळणार आहे.

२०१९मध्ये रमाबाई आणि माधवराव पेशवे यांच्यावर आधारित असलेली ‘स्वामिनी’ मालिका आली होती. या मालिकेत सृष्टी पगारे, ऐश्वर्या नारकर, रेवती लेले, अमोल बावडेकर, सुरभी भावे, नीना कुळकर्णी, अभिषेक रहाळकर, अनिल गवस, उमा पेंढारकर असे अनेक तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळाले होते. याच मालिकेत माधवरावांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय पटवर्धन आता ‘इंद्रायणी’ मालिकेत झळकणार आहे. मोठ्या गोपाळची भूमिका चिन्मय साकारणार आहे.

दरम्यान, चिन्मय पटवर्धनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ‘स्वामिनी’ मालिकेनंतर बऱ्याच नाटकात, शॉर्ट फिल्म्स विविधांगी भूमिका निभावल्या. सध्या त्याचं ‘मी Vs मी’ नाटक रंगभूमी गाजवत आहे. या नाटकात चिन्मयसह क्षितिज दाते, शिल्पा तुळसकर, महेश सुभेदार, दिनेश सिंह आणि हृषिकेश जोशी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Story img Loader