लग्नानंतर प्रत्येक जोडप्याच्या वैयक्तिक आयुष्यात असंख्य बदल होतात. गेल्या दोन महिन्यांत मुग्धा-प्रथमेश, स्वानंदी-आशिष, सुरुची-पियुष, गौतमी-स्वानंद अशा अनेक मराठी सेलिब्रिटी जोडप्यांनी लग्नगाठ बांधत नव्या प्रवासाला सुरुवात केली. यातील काही जणांनी नवीन घरं खरेदी केली, तर अनेकांनी जुन्या घरातच काही बदल केले. सध्या अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी यांनी २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यात लग्नगाठ बांधली. या जोडप्याच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. स्वानंदी -आशिषच्या लग्नासमारंभातील बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्यांच्या लग्नाला दीड महिना उलटून गेल्यावर या जोडप्याने चाहत्यांबरोबर एक खास गोष्ट शेअर केली आहे.
स्वानंदी-आशिष लग्नाआधीपासून एकत्र राहत होते. ओळख झाल्यावर अवघ्या ३ ते ४ महिन्यांत या दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. आता लग्नानंतर या जोडप्याने त्यांच्या राहत्या घरात एक खास बदल केला आहे. हा बदल म्हणजे दारावरची सुंदर नेमप्लेट.
हेही वाचा : लगीनघाई! भगरे गुरुजींच्या लेकीने केलं तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडकेचं केळवण, फोटो शेअर करत म्हणाली…
लग्नानंतर स्वानंदीने तिच्या घरासाठी साधी अन् सुंदर अशी खास नेमप्लेट बनवून घेतली आहे. रातराणी फुलांची डिझाइन असलेली ही सुंदर लाकडी नेमप्लेट प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते. या नेमप्लेटवर मध्यभागी “स्वानंदी आशिष” असं नाव लिहिण्यात आलं आहे. अभिनेत्रीने तिच्या संकल्पनेनुसार ही खास नेमप्लेट बनवून घेतली आहे.
स्वानंदी-आशिषने या नवीन नेमप्लेटचे सुंदर फोटो सोशल मीडियावर नुकतेच शेअर केले आहेत. नेटकऱ्यांनी ही सुंदर अशी नेमप्लेट पाहून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच स्वानंदीचे बाबा ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांनी देखील कमेंट सेक्शनमध्ये लेकीचं कौतुक केलं आहे.