मराठी मनोरंजन सृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा अभिनेता स्वप्नील जोशीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. बालकलाकार म्हणून त्याने त्याच्या करिअरची सुरुवात केली. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा सगळ्याच माध्यमातून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घडामोडीही विविध माध्यमांतून चाहत्यांची शेअर करत असतो. आता त्याने त्याच्या दहावीतली एक आठवण सांगितली आहे.
स्वप्नील जोशी आणि त्याची आई या आठवड्यात ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमात पाहुणे म्हणून हजेरी लावताना दिसणार आहेत. यावेळी स्वप्नील आणि त्याच्या आई लहान मुलांनी गायलेल्या गाण्यांचा आस्वाद तर घेणारच आहेत पण याबरोबरच ते दोघे स्वप्निलच्या बालपणीच्याही काही आठवणी चाहत्यांशी शेअर करणार आहेत. या कार्यक्रमातील त्या दोघांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या दहावीच्या बोर्डाचा एक फोटो दाखवते स्वप्नीलला १०वीमध्ये ७९.८५ टक्के मिळाल्याचं दिसत आहे. या फोटोच्या आठवणी शेअर करताना त्याची आई म्हणाली, “स्वप्नील दहावीत असताना आम्ही त्याच्याकडून विशेष असं काहीही करून घेतलं नव्हतं. तो त्याच्या मित्रांबरोबर आणि वर्गामध्ये जितका अभ्यास करायचा त्यावरून त्याला हे मार्क मिळाले. परमेश्वराची त्याच्यावर कृपा आहेच आणि तो एकपाठी आहे.” तर पुढे स्वप्नील म्हणाला, “माझ्या दहावीच्या परीक्षेच्या वेळी मी पुण्यात साधू वास्वानी मिशन म्हणून खूप मोठं नाव आहे. परमेश्वराचाच अवतार आपण त्यांना म्हणूया. तर दादांच्या आयुष्यावर एक डॉक्युड्रामा बनत होता. त्यामध्ये मी दादांच्या लहानपणीची भूमिका साकारत होतो. आम्ही त्याचं शूटिंग आधी केलं होतं आणि नंतर त्या कॅसेट जळल्या. त्यात आमचं चार दिवसाचं शूटिंग गेलं. तर आम्हाला त्या दिग्दर्शकांचा फोन आला की हे शूटिंग आपल्याला मिशनमध्ये सबमिट करायचं आहे त्यामुळे आता आपल्याला चार दिवस शूटिंग करावं लागेल.”
हेही वाचा : “अचानक मोठी झाली यार…”; लेकीसाठी पोस्ट लिहीत स्वप्निल जोशी भावूक
पुढे तो म्हणाला, “तेव्हा माझे खूप नातेवाईक घरी आले होते आणि ते आई-वडिलांना खूप बोलले की, तुम्ही तुमच्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं करताय, त्याला काय पैसेच कमवायला लावायचं आहे का? वगैरे वगैरे… तेव्हा मला आई-बाबा असं म्हणाले होते की, ती माणसं खरोखर अडकली आहेत आणि तुझ्या एकट्यामुळे त्यांचं नुकसान होईल. तू म्हणालास तर आपण त्यांना हो सांगूया नाहीतर आपण त्यांना नाही म्हणूया. तेव्हा मी बाबांना शूटिंगला जायला होकार दिला होता आणि त्यानंतर मला हे मार्क मिळाले. त्यामुळे ते माझ्यासाठीही खूप खास आहेत. कारण तुम्ही कुठलीही चांगली गोष्ट चांगल्या हेतूने केली तर परमेश्वर तुमच्या मागे उभा राहतो.” तर आता या व्हिडिओवर कमेंट करत स्वप्नीलचं चाहते त्याचं कौतुक करत आहेत.