लग्नसराई सुरू होताच अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकले. गौतमी देशपांडे, सुरुची अडारकर, मुग्धा वैशंपायन, शिवानी सुर्वे, प्रथमेश परब, पूजा सावंत, योगिता चव्हाण, तितीक्षा तावडे अशा अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं आहे. येत्या काळातही बरेच कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे स्वरदा ठिगळे.
‘माझे मन तुझे झाले’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्वरदा ठिगळे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. यासंबंधित स्वरदा इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत होती. आता स्वरदाच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. आज देवक विधी झाला आहे. त्यामुळे आता लवकरच स्वरदा लग्नगाठ बांधणार आहे.
हेही वाचा – अभिनेत्री तेजश्री प्रधानची बहीण कोण आहे? काय काम करते? जाणून घ्या…
अभिनेत्री स्वरदाने देवक विधीचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये स्वरदा हिरव्या रंगाच्या खणाच्या साडीत पाहायला मिळत आहे. गजरा, नाकात नथ आणि डोक्यावर मुंडावळ्या अशा पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.
दरम्यान, जानेवारीमध्ये स्वरदाने साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मोठ्या थाटामाटात अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला होता. स्वरदाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धार्थ राऊत असं आहे. सिद्धार्थ हा इंटिरियर डिझायनर असल्याची माहिती त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर दिली आहे.
हेही वाचा – Video: …म्हणून ३७ वर्षांनंतर गोविंदाने पुन्हा केलं लग्न; माधुरी दीक्षित व सुनील शेट्टी होते हजर
स्वरदाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने २०१३ साली ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. यानंतर ती हिंदी मालिकेत झळकली. तिने ‘सावित्री देवी कॉलेज’ या हिंदी मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर तिने ‘प्यार के पापड’ या मालिकेतही काम केलं. या दोन हिंदी मालिकेनंतर ती पुन्हा मराठी मालिकेत झळकली. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत तिने ताराराणी यांची भूमिका उत्तमरित्या साकारली. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता.