आपल्या मुलांनी उच्चशिक्षित होऊन मोठं यश मिळवावं असं स्वप्न प्रत्येक आई-बाबांचं असतं. मराठी सिनेविश्वात सक्रिय असणाऱ्या अनेक कलाकारांच्या मुलांनी वैयक्तिक आयुष्यात गगनभरारी घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच सुकन्या मोने यांच्या लेकीने परदेशात मास्टर्स डिग्री मिळवल्याची आनंदाची बातमी सर्वांना मिळाली होती. याशिवाय विशाखा सुभेदार, अविनाश व ऐश्वर्या नारकर यांसारख्या अनेक कलाकारांची मुलं सध्या परदेशात विविध विषयांमध्ये आपलं उच्चशिक्षण पूर्ण करत आहेत. तर, काही कलाकारांची मुलं आपल्याच देशात शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रांमध्ये नाव कमावत आहेत.

आपली मुलं समाजात जेव्हा मोठं यश मिळवतात तेव्हा साहजिकच प्रत्येक पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटतो. सध्या मालिकाविश्वातील अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याच्या लेकीने मिळवलेल्या यशाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या अभिनेत्यांचं नाव आहे अजय तपकिरे.

विविध मालिका व सिनेमांमधून अजय तपकिरे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे अजय तपकिरे यांना घराघरांत लोकप्रियता मिळाली. यामध्ये त्यांनी स्वराज्याचे गुप्तचर प्रमुख बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारली होती. अजय तपकिरे सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करत लेक डॉक्टर झाल्याची आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे.

अजय तपकिरे यांची लेक प्रणाली तपकिरे ही डॉक्टर झाली आहे. लोकनेते राजारामबापू पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधून प्रणालीने बीएएमएसचे शिक्षण पूर्ण केलं आहे. अभिनेत्यांनी लेकीच्या दीक्षांत समारंभातील ( Convocation Ceremony ) काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या संपूर्ण कलाविश्वातून प्रणालीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

marathi actor daughter become doctor
मराठी अभिनेत्याची लेक झाली डॉक्टर ( Marathi Actor Ajay Tapkire )

दरम्यान, अजय तपकिरे यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘कारभारी लयभारी’, ‘कॉन्स्टेबल मंजू’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये ते झळकले आहेत. याशिवाय ‘शिवप्रताप गरुडझेप’, ‘व्हॉट्सॲप लग्न’, अन्ना अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे.