‘गुलाबी साडी’ या गाण्याने गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. संजू राठोडच्या या गाण्याला सगळ्यांनीच पसंती दर्शवली आहे. हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच सर्वांची लाडकी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम बबिताला सुद्धा या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही. अभिनेत्रीने खास गुलाबी रंगाची साडी नेसून या गाण्यावर सुंदर असा व्हिडीओ शूट केला आहे.
‘गुलाबी साडी’ हे गाणं आता तसं जुनं झालं. पण, असं असलं तरीही आजही या गाण्याची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या वर्षानुवर्षे चालू असलेल्या मालिकेतील बबिताने या गाण्यावर नुकताच एक रील व्हिडीओ बनवला आहे. “हांजी…एखादी गोष्ट न करण्यापेक्षा थोडी उशिरा केली तरी उत्तम” असं कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या डान्स व्हिडीओला दिलं आहे.
हेही वाचा : “अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
‘गुलाबी साडी’ या गाण्याचा ट्रेंड मध्यंतरी सर्वत्र चालू होता. मराठी कलाविश्वातील बहुतांश सगळ्याच सेलिब्रिटींनी या गाण्यावर डान्स व्हिडीओ बनवले आहेत. आता सध्या अन्य गाणी इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असली तरीही मुनमुनने शेअर केलेला व्हिडीओ पाहता ‘गुलाबी साडी’ गाण्याची क्रेझ अद्याप कायम आहे असं म्हणता येईल.
लाडक्या बबिताचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. “गुलाबी साडी आता सर्वत्र पोहोचली आहे”, “बबिता रॉक जेटाजी शॉक”, “बहुत लेट हो गया”, “मॅम खूपच सुंदर” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडीओवर केल्या आहे.
दरम्यान, बबिताच्या व्हिडीओवर या गाण्याचा गायक संजू राठोडने देखील कमेंट केली आहे. “भारी…” अशी एका शब्दांत प्रतिक्रिया देत संजूने पुढे सुंदर डान्स दर्शवणारे इमोजी जोडले आहेत आणि या अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. दरम्यान, मुनमुनच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचा ती गेली अनेक वर्षे भाग आहे. मालिकेमुळे तिला आता सर्वत्र बबिता अशी एक वेगळी ओळख मिळाली आहे. अभिनेत्री विविध पोस्ट, रील्स शेअर करून कायम तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असते.