‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग सध्या रुग्णालयात दाखल आहे. मंगळवारी (८ जानेवारी २०२४) सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने ही माहिती दिली. त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये गुरुचरण सिंगला सलाईन लावलेली दिसत आहे.
व्हिडीओमध्ये गुरुचरण म्हणाला, “माझी प्रकृती खालावली आहे, रक्त तपासणी केली आहे, लवकरच माझ्या आरोग्याबाबत अपडेट देईन.” कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “काल गुरुपूरबच्या दिवशी, गुरु साहेबांनी मला नवं जीवन दिलं. मी त्यांचे अनेक वेळा आभार मानतो. आपणा सर्वांनाही धन्यवाद, गुरु साहेबांच्या कृपेने आज मी जिवंत आहे. सर्वांना दिल से नमस्कार आणि धन्यवाद.”
२०२४ मध्ये, गुरुचरण सिंग त्याच्या घरातून गायब झाला होता. तो एक महिना घरी परतला नव्हता. अभिनेता दिल्लीतील त्याच्या घरातून एका मिटिंगसाठी बाहेर पडला होता आणि बराच वेळ परतला नाही. मात्र, एक महिना गेल्यानंतर तो परत आला, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला होता.
हेही वाचा…Video: श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांचा लेकींबरोबरचा मजेशीर अंदाज पाहिलात का? व्हिडीओ होतोय व्हायरल
१.२ कोटी रुपयांचे कर्ज आणि ३४ दिवसांपासून सोडलेले जेवण
गेल्यावर्षी एका मुलाखतीत गुरुचरण सिंगने त्याच्यावर १.२ कोटींचे कर्ज झाले होते असे सांगितले होते. या तणावामुळे त्याने एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून त्याने जेवण सोडले होते. त्याने याकाळात फक्त लिक्विड डाएट घेतला होता असे त्याने सांगितले होते. तो म्हणाला होता, “मी ३४ दिवसांपासून मी जेवण बंद केलंय. मी दूध, चहा आणि नारळपाणी एवढंच पितोय. गेल्या चार वर्षांत मी फक्त अपयशच पाहिलं आहे. मी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पण मला कशातच यश मिळालं नाही. आता मी थकलो आहे आणि आता मला पैसे कमवायचे आहेत,” असे गुरुचरण सिंग म्हणाला होता.