‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय विनोदी मालिकेत एकेकाळी रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग दोन महिन्यांपूर्वी खूप चर्चेत राहिला. तो जवळपास एक महिना बेपत्ता होता. पोलिसांनी शोधमोहीम राबवूनही तो सापडला नव्हता. अखेर स्वतःच २५-२६ दिवसांनी घरी परतला होता. काही दिवस बेपत्ता राहून घरी परतल्यानंतर पहिल्यांदाच अभिनेता मुंबईत आला. आता एका मुलाखतीत तो इतक्या दिवसांनी घरी पोहोचल्यावर त्याच्या वृद्ध आई-वडिलांनी कशी प्रतिक्रिया दिली याबद्दल सांगितलं.
गुरुचरण सिंग म्हणाला, “रात्र झाली होती आणि माझी आई बाहेर आली.. सुरुवातीला ती मला ओळखूही शकली नाही. बाहेर अंधार होता आणि खूप उशीर झाला होता. रात्रीचे दोन वाजले असतील. मग तिने माझ्या वडिलांना हाक मारली आणि म्हटलं की बाहेर या आणि बघा कोणीतरी आलंय. त्यानंतर माझे वडील बाहेर आले, ते मला पाहून म्हणाले, ‘अरे हा तर आपला सोनू आहे'”.
आम्ही खूप रडलो – गुरुचरण सिंग
‘टेली टॉक’ला दिलेल्या मुलाखतीत पुढे तो म्हणाला, “ती मला पाहून खूप आनंदी होती आणि मग तिने दार उघडण्यासाठी बटण दाबले. मी वर गेलो. त्यानंतर आम्ही तिघे खूप वेळ रडलो. ते आनंदाचे अश्रू होते”. गुरुचरणने याच मुलाखतीत सांगितलं की घर सोडून निघून गेल्यावर त्याचा माघारी परतण्याचा काहीच विचार नव्हता पण देवाने काही संकेत दिले, त्यामुळे घरी परत येण्याचा निर्णय घेतला.
२२ एप्रिल रोजी झाला होता बेपत्ता
गुरुचरण सिंग २२ एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला येणार होता. तो विमानतळावर जाण्यासाठी दिल्लीतील पालम येथील घरातून निघाला पण तो विमानतळावर पोहोचलाच नाही. त्याला घ्यायला मुंबईत त्याची मैत्रीण विमानतळावर गेली होती, पण तो विमानात बसलाच नाही असं तिला एअरलाइन्स अधिकाऱ्यांकडून कळालं. त्यानंतर गुरुचरणच्या मित्रांनी त्याचा शोध सुरू केला, पण त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही.
गुरुचरण सिंग अचानक परतला घरी
चार दिवस शोध घेऊनही तो न सापडल्याने गुरुचरणचे वडील हरगीत सिंग यांनी पोलिसांत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. तपासात तो दिल्लीत फिरताना काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला होता. पण नंतर त्याची माहिती मिळाली नाही. पोलिसांनी हरयाणा, उत्तराखंड व दिल्लीसह मुंबईत त्याचा शोध घेतला होता. मुंबईतील ‘तारक मेहता…’ मालिकेच्या सेटवर भेट देऊन पोलिसांनी त्याच्याबद्दल विचारणा केली पण कोणालाच माहिती नव्हती. अशातच अचानक १८ मे रोजी तो परतला आणि धार्मिक प्रवासावर निघून गेल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं होतं.