छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या मालिकेतील मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने काही महिन्यांपूर्वी या मालिकेला रामराम ठोकला. आता तिने या शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने असित मोदींबरोबरच प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात लैंगिक छळ केल्याबद्दलची तक्रार दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने नुकतंच ई-टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ही मालिका सोडण्याबरोबरच विविध गोष्टींबद्दल खुलासा केला. या वेळी तिने मालिकेच्या निर्मात्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
आणखी वाचा : ‘तारक मेहता…’ मालिकेतील ‘या’ फोटोमध्ये आहेत पाच फरक, बघा तुम्हाला येतात का ओळखता?

“होळीच्या दिवशी म्हणजे ७ मार्चला माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. मी त्यांना चार वेळा ‘हाफ डे’बद्दल विचारणा केली होती. पण सोहेलने माझी गाडी जबरदस्तीने थांबवली. तो मला जाऊ देत नव्हता. मी गेल्या १५ वर्षांपासून या कार्यक्रमात काम करतेय, त्यामुळे तुम्ही माझ्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाही, असेही मी त्यांना सांगितले. पण यानंतर सोहेलने मला धमकावले. मी माझ्या संपूर्ण टीमला आधीच सांगितले होते की, माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी मी अर्धा दिवस काम करेन. मला एक लहान मुलगी आहे, जी त्या दिवशी होळी खेळण्यासाठी माझी वाट पाहत होती. पण निर्मात्यांनी मला जाऊ दिले नाही,” असा आरोप जेनिफरने केला आहे.

गरोदर असताना मला नोकरीवरुन काढण्यात आले

“मी दोन तासांच्या विश्रांतीनंतर परत येईन, असेही त्यांना सांगितले. पण त्यांना ते मान्य नव्हते. ‘तारक मेहता…’ मालिकेचे निर्माते अनेकदा पुरुष अभिनेत्याशी सहजपणे जुळवून घेतात. ते पुरुषवादी विचाराचे लोक आहेत. या वेळी जतीनने माझी गाडी जबरदस्तीने थांबवली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाला आहे. ही घटना ७ मार्चची आहे. मला वाटले हे लोक मला पुन्हा फोन करतील. पण २४ मार्चला सोहेलने मला नोटीस पाठवली की मी शूटिंग अचानक सोडल्याने तो माझे पैसे कापत आहे. ते मला सतत घाबरवत आहेत, असेही ती म्हणाली.

“मी ४ एप्रिलला त्यांना व्हॉट्सॲपवर याबद्दल उत्तर दिले होते. माझा लैंगिक अत्याचार झाला आहे, असे मी त्यात म्हटले होते. पण त्यांनी मी त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर मी वकिलाची मदत घेऊन असित मोदी, सोहेल रमाणी आणि जतीन बजाज यांना नोटीस पाठवली. मला यावर कोणतेही उत्तर मिळालेले नाही. पण पोलीस यावर नक्कीच योग्य ती कारवाई करतील, याची मला खात्री आहे. मी गरोदर असताना मला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. त्या वेळी माझा अर्धा पगारही कापला होता,”असा खुलासा तिने केला.

आणखी वाचा : “गेल्या १४ वर्षांपासून…” ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’तील कलाकारांनी मालिका सोडण्यामागचे खरं कारण समोर

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये संधी कशी मिळाली? शिवाली परबने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “आगरी भाषा…” 

मी नोकरी जाण्याच्या भीतीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे

“सेटवर सातत्याने माझा मानसिक आणि लैंगिक छळ होत होता. आम्ही सिंगापूरमध्ये शूटिंग करत होतो, तेव्हा माझ्या लग्नाचा वाढदिवसही होता. पण रात्री असित मोदी मला म्हणाले, “तुझ्या लग्नाचा वाढदिवस संपला आहे. त्यामुळे माझ्या खोलीत ये, आपण दोघेही दारू पिऊ.” असित मोदीने अनेकदा माझ्याबद्दल लैंगिक टिप्पणी केली आहे. एकदा तर त्यांनी सर्वांसमोर माझ्यावर लैंगिक टिप्पणी करत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण तिथे असलेल्या सहकलाकारांनी या गोष्टी सांभाळून घेतल्या होत्या. एकदा त्याने मला ‘सेक्सी’ म्हटले होते आणि माझे गालही ओढले होते. असित मोदी माझ्यावर अनेक लैंगिक टिप्पणी करायचे. पूर्वी मी नोकरी जाण्याच्या भीतीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे, पण आता मला हे सहन होत नाही”, असे जेनिफर यांनी सांगितले.

दरम्यान या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी जेनिफरने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आम्ही याबद्दल कायदेशीर कारवाई करु. कारण ती माझी आणि शो दोघांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. तिचे सर्व आरोप निराधार आहेत, असे असित कुमार मोदी यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah actress jennifer mistry bansiwala accused producer asit kumarr modi of sexual harassment nrp
Show comments