‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील दयाबेन ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी शोमध्ये परत येईल अशी बऱ्याच काळापासून चर्चा आहे. पण अद्याप ती मालिकेत परतलेली नाही. लग्नानंतर दिशाने मालिकेत ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती मालिकेत पुन्हा दिसली नाही. तसेच ती सोशल मीडियावरही सक्रिय नाही. पण आता नवरात्र सुरू आहे. त्यानिमित्ताने दिशाने पती व मुलांबरोबर एका कार्यक्रमाला हजेरी लावली. तिथले त्यांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.
मालिकेतून ब्रेक घेतल्यानंतर दिशा अभिनयसृष्टीतील कार्यक्रमांमध्ये दिसली नाही. तसेच ती सोशल मीडियावरही नाही, पण अखेर दिशाचे चाहत्यांना दर्शन झाले आहेत. दिशाने पती व मुलांबरोबर एका कार्यक्रमाला हजेरी लावली आणि ती पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ‘फिल्मीग्यान’ने शेअर केलेल्या व्हिडीओत दिशाने गोल्डन रंगाचा लेहेंगा घातला होता. त्यावर गुलाबी रंगाची ओढणी घेतली होती. अगदी कमी मेकअप करून केस मोकळे सोडले होते.
यावेळी दिशाच्या पती मयूरने लहान मुलाला कडेवर घेतलं होतं. मयूरने शेरवानी घातली होती. दिशाने पती व मुलांबरोबर देवीचे दर्शन घेतले. तसेच ती तिच्या चिमुरड्या लेकीला सांभाळताना दिसली.
दिशा जवळपास ६ वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. दिशाने २०१५ मध्ये मयूर पडियाशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर दोन वर्षे मालिकेत काम केलं. गरोदर राहिल्यानंतर दिशाने ब्रेक घेतला, त्यानंतर ती मालिकेत परतेल असं म्हटलं जात होतं. पण सहा वर्षे उलटूनही अद्याप दिशा मालिकेत परतलेली नाही. तसेच निर्मात्यांनी तिची रिप्लेसमेंटही घेतलेली नाही.