टेलिव्हिजनवरील सर्वाधिक काळ चाललेला शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’. आजही हा शो लोकांची पहिली पसंती आहे. विनोदी मालिका असलेला हा शो १४ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शोमध्ये स्टारकास्ट बरीच मोठी आहे मात्र एक एक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आतापर्यंत या शोमध्ये सुरुवातीपासून काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी शो सोडला आहे. मात्र आजही त्यांची प्रेक्षकांच्या मनात खास जागा आहे. यापैकीच एक कलाकार रोशन सिंग सोढी म्हणजेच अभिनेता गुरुचरण सिंग. ज्यांनी या भूमिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं.
शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये पार्टीसाठी कायम तयार असणारे आणि आपल्या पत्नीवर खूप प्रेम करणारे रोशन सिंग सोढी यांचं खरं नाव गुरुचरण सिंग असं आहे. त्यांच्या बिनधास्त अंदाजाने ही व्यक्तीरेखा खूप गाजली आहे. आज ते या शोचा भाग नाहीत पण जेव्हा रोशन सिंग सोढी या व्यक्तीरेखेचं नाव घेतलं जातं तेव्हा सर्वात आधी गुरुचरण सिंग यांचा चेहरा समोर येतो. आज गुरुचरण सिंग यांचं नाव खूप मोठं असलं तरीही एक वेळ अशी होती की कर्जबाजारी झाल्याने त्यांना मुंबईत यावं लागलं होतं.
आणखी वाचा- ‘तारक मेहता…’मध्ये कधीच परतणार नाही दयाबेन? शैलेश लोढा यांच्या पोस्टने वेधलं लक्ष
‘तारक मेहता…’ मालिकेत पूर्वी रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारणाऱ्या गुरुचरण सिंग यांनी त्यांच्या एक लाइव्ह व्हिडीओमध्ये सांगितलं होतं की त्यांनी कामाच्या शोधात मुंबईची वाट तेव्हा धरली होती जेव्हा त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. लोक पैसे मागण्यासाठी त्यांच्या घरी येत असत. जेव्हा काहीच पर्याय राहिला नाही तेव्हा त्यांनी कामासाठी थेट मुंबईची वाट धरली आणि सहा महिन्यांच्या आतच त्यांना ‘तारक मेहता…’मध्ये भूमिका मिळाली.
गुरचरण सिंग सुरुवातीपासूनच या शोचा एक भाग होते. त्याने २०१३ मध्ये शो सोडला पण लोकांच्या आग्रहास्तव २०१४ मध्ये ते पुन्हा शोमध्ये परतले. पण सहा वर्षे काम केल्यानंतर त्यांनी २०२० मध्ये पुन्हा एकदा या शोचा निरोप घेतला. त्यावेळी त्यांच्या जागी सध्या रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणाऱ्या बलविंदर सिंग सूरी यांना घेण्यात आले.