‘तारक मेहता का उल्टा चष्मा’फेम अभिनेता गुरुचरण सिंग एप्रिल महिन्यात बेपत्ता झाला होता. २६ दिवसांनी १७ मे रोजी तो स्वत:हून घरी परतला. याबाबत त्याच्या वडिलांनी पोलिस तक्रार दिली होती. पोलिसांनी त्याचा बर्याच ठिकाणी शोध घेतला होता.
गुरुचरण बेपत्ता झाल्याने त्याचं कुटुंब, सहकलाकार, चाहत्यांसह सगळेच चिंताग्रस्त होते. गुरुचरणने परतल्यानंतरदेखील मौन पाळलं, पण आता त्याने सांगितलं की, तो आध्यात्मिक प्रवासासाठी गेला होता. बेपत्ता झाल्यानंतर गुरुचरण सिंगने ‘बॉम्बे टाईम्स’ला मुलाखत दिली. यादरम्यान त्याच्या बेपत्ता होण्यामागचं कारण त्याने सांगितलं आणि म्हणाला की, त्याला कधीच परत घरी यायचं नव्हतं.
हेही वाचा… “मी आता कधीच आई होऊ शकत नाही”, राखी सावंतचं विधान चर्चेत; म्हणाली, “खूप वेदना…”
गुरुचरण सिंगने सांगितलं की, तो नेहमीच एक आध्यात्मिक व्यक्ती होता आणि जेव्हा तो दु:खात होता, तेव्हा त्याने स्वत:ला देवाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्याने असंदेखील सांगितलं की, तो एका आध्यात्मिक प्रवासासाठी गेला होता आणि त्याला पुन्हा घरी कधीच परतायचं नव्हतं. परंतु, नंतर तो घरी आला कारण देवानेच त्याला तसं करण्याचा संकेत दिला होता, असं त्याचं म्हणणं होतं.
गुरुचरणला जेव्हा विचारण्यात आलं की, हा पब्लिसिटी स्टंट होता का? तर यावर अभिनेता म्हणाला की, जर त्याला पब्लिसिटी स्टंट करायचा असता तर त्याने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील त्याच्या मानधनाच्या थकबाकीबद्दल मुलाखती दिल्या असत्या, पण त्याने तसं केलं नाही. गुरुचरण सिंगने असंही सांगितलं की, तो परतल्यानंतर त्याने कोणत्याच मुलाखती दिल्या नाहीत आणि त्याने आता बोलण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला लोकांचे काही गैरसमज दूर करायचे होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गुरुचरण सिंगने त्याच्या मैत्रिणीबरोबर एक डान्स व्हिडीओ शेअर केला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. “पीओव्ही- फायनली घर वापस आने की खुशी” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं होतं.