‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी, प्रोडक्शन हेड सोहेल रमानी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडले आहेत. मालिका सोडलेल्या काही कलाकारांनी निर्मात्यांवर गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले आहेत. मिसेस रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्री सातत्याने मालिकेच्या निर्मांत्यांवर आरोप करीत आहे.
मालिकेतील एका अभिनेत्रीच्या तक्रारीच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाची आता मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. पवई पोलिसांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा निर्मात्यांविरुद्ध आयपीसीच्या कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत लैंगिक शोषण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, याबाबत मिसेस रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्री मीडियाशी संवाद साधताना म्हणाली की, “माझी असित मोदींनी सर्वांसमोर जाहीर माफी मागितली पाहिजे.”
हेही वाचा : “बॉयफ्रेंडमधील कोणता गुण सर्वात जास्त आवडतो?” तमन्ना भाटियाने एका शब्दात दिले उत्तर; म्हणाली…
जेनिफर मिस्त्रीने मीडियाशी बोलताना सांगितले की, “निर्मात्यांनी माझ्यावर अनेक खोटे आरोप केले आहेत. त्यांना माझा एवढाच त्रास होता, तर दिलकुश गेल्यानंतर मला शोमध्ये पुन्हा का बोलावले? निर्मात्यांनी माझी जाहीर माफी मागितली पाहिजे हेच माझे पहिल्या दिवसापासून म्हणणे आहे.”
हेही वाचा : “कुंदनला रोखलंत, पण शंकरला कसं थांबवाल?” ‘रांझना’च्या सिक्वेलची घोषणा, धनुषच्या लुकने वेधलं लक्ष
दरम्यान, जेनिफर मिस्त्रीने काही दिवसांपूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो सोडला. १५ वर्षांनंतर शोमधून बाहेर पडल्यानंतर तिने शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर मानसिक छळ आणि गैरवर्तन केल्याचे गंभीर आरोप केले होते. जेनिफरप्रमाणे मालिकेत बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदोरियाने सुद्धा निर्मात्यांवर टीका केली आहे.