लोकप्रिय टीव्ही अभिनेता बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. टीव्हीवरील विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा मालिकेत एकेकाळी सोढी ही भूमिका साकारणारा गुरुचरण सिंग दिल्लीतून बेपत्ता झाला आहे. अभिनेता चार दिवसांपूर्वी दिल्ली विमानतळावरून बेपत्ता झाला आहे. तो मुंबईला जाण्यासाठी निघाला होता, पण तो मुंबईला पोहोचला नसून घरीही परतलेला नाही.
‘ई टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार गुरुचरण सिंगच्या वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीची एक डिजिटल प्रत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘माझा मुलगा गुरुचरण सिंग, वय ५० वर्षे, २२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाला होता. तो विमानतळावर गेला होता, पण तो मुंबईला पोहोचला नाही व अजून घरीही परतला नाही. त्याचा फोन बंद आहे. तो मानसिकदृष्ट्या स्थिर आहे आणि आम्ही त्याचा शोध घेत आहोत, पण तो अजूनही सापडला नसून बेपत्ता आहे,’ असं या तक्रारीत गुरुचरणच्या वडिलांनी म्हटलं आहे.
गुरुचरण सिंग शेवटचा टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत दिसला होता. पण त्याच्या वडिलांच्या प्रकृतीची कारणं देत त्याने हा टीव्ही शो सोडला. आपल्याला कुटुंबाकडे लक्ष द्यायचंय, असं तो शो सोडताना म्हणाला होता. पण हा शो सोडणाऱ्या इतर कलाकारांप्रमाणे त्याचंही मानधन निर्मात्यांनी थकवलं होतं. पण जेनिफर मिस्त्रीने निर्मात्यांविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दिल्यानंतर अभिनेत्याला त्याचे पैसे मिळाले होते.