‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून कलाकार सोडून जात असल्यामुळे चर्चेत आहे. अशातच टिपेंद्र जेठालाल गडा म्हणजेच टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकत याने शो सोडल्याची चर्चा सातत्याने होत आहे. पण राजने स्वतः याबद्दल कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता त्याने शोबद्दलच्या चर्चांवर मौन सोडलंय. मंगळवारी इंस्टाग्रामवर राजने एक पोस्ट केली आहे, त्यात त्याने मालिका सोडल्याचं सांगितलंय.
राजने पोस्टमध्ये असं लिहिलंय की, “आता सर्व प्रश्न आणि अंदाजांना विराम देण्याची वेळ आली आहे. नीला फिल्म प्रॉडक्शन आणि तारक मेहता का उल्टा चष्माबरोबरचा माझा संबंध अधिकृतपणे संपला आहे. शिकण्याचा, मित्र बनवण्याचा आणि माझ्या कारकिर्दीतील काही सर्वोत्तम वर्षांचा हा एक अद्भुत प्रवास होता. या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो. मालिकेची पूर्ण टीम, माझे मित्र, कुटुंब आणि अर्थातच तुम्हा सर्वांचे (प्रेक्षक). ज्या प्रत्येकाने शोमध्ये मला स्वीकारलं आणि माझ्यावर ‘टप्पू’ म्हणून प्रेम केलं. तुमच्या माझ्यावरील प्रेमामुळे मी प्रत्येक वेळी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. मालिकेच्या टीमला शोच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मी लवकरच तुमच्या सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी परत येईन. तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच राहुद्या,” असं राजने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय.
राजच्या या पोस्टवर चाहत्यांनी ‘तुला मालिकेत खूप मिस करू’, ‘तुला भविष्यासाठी शुभेच्छा’ अशा कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राजने शो सोडल्याच्या बातम्यांदरम्यान पिंकविलाशी बोलताना सूचक वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता, “माझे चाहते, माझे प्रेक्षक, माझे हितचिंतक, सर्वांना माहित आहे की मी चांगला सस्पेन्स तयार करतो. त्यामुळे माझ्या निर्णयाबद्दल योग्य वेळ आली की सर्वांना कळेल.”
शैलेश लोढा ‘तारक मेहता…’ मालिकेत परतणार? दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत, म्हणाले…
गेले अनेक दिवस राज मालिकेत दिसत नव्हता. त्यामुळे त्याने मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण त्याने किंवा मालिकेच्या निर्मात्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती. त्यामुळे तो मालिकेत परतेल, असा अंदाज लावला जात होता. पण आता खुद्द राजनेच मालिका सोडल्याचं स्पष्ट केलंय.