गेल्या १६-१७ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. प्रेक्षकही सुरुवातीपासून या मालिकेवर भरघोस प्रेम करताना पाहायला मिळत आहेत. आजही मनोरंजनासाठी घरोघरी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका आवर्जून पाहिली जाते. अशा या लोकप्रिय मालिकेत लवकरच मोठा बदल दिसणार आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत नव्या दयाबेनची एन्ट्री होणार आहे. निर्मात्यांना नवीन दयाबेन भेटली असून, मॉक शूटला सुरुवात झाली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत दयाबेनची भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने उत्कृष्टरीत्या पेलली. जेठालाल म्हणजे दिलीप जोशीबरोबर दिशाची जोडी चांगली जमली होती. पण, २०१८मध्ये दिशा वकानी सुटीवर गेली आणि ती परतलीच नाही. असित मोदींनी अनेकदा दिशाला पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यांना काही यश मिळालं नाही. काही महिन्यांपूर्वी असित मोदींनी स्वतः सांगितलं होतं की, दिशा वकानी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत पुन्हा येणार आहे. आता या मालिकेत दिशाची जागा घेण्यासाठी नवीन दयाबेन भेटली आहे.

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार, एका सूत्रानं सांगितलं की, दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेणाऱ्या असित मोदींना एक अभिनेत्री पसंत पडली आहे. दयाबेनच्या भूमिकेसाठी योग्य असणाऱ्या या अभिनेत्रीला शॉर्टलिस्ट केलं गेलं आहे. ही अभिनेत्री कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. पण, टीमने नव्या दयाबेनसह मॉक शूटला सुरुवात केली आहे.

सूत्राकडून सांगितलं गेलं की, असित मोदी यांना या अभिनेत्रीनं दयाबेनच्या भूमिकेसाठी दिलेलं ऑडिशन खूप आवडलं आहे आणि ते इम्प्रेस झाले आहेत. त्यामुळे आता ही अभिनेत्री आठवडाभरापासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या टीमबरोबर शूट करीत आहे.

दरम्यान, जानेवारी २०२५ मध्ये असित मोदी दिशा वकानीला पुन्हा घेऊन येण्यासंदर्भात म्हणाले होते की, मी अजूनही प्रयत्न करीत आहे. मला वाटतं की, दिशा पुन्हा येणार नाही. तिला दोन मुलं आहेत आणि ती माझ्या बहिणीसारखी आहे. आजही तिच्या कुटुंबाबरोबर आमचं चांगलं नातं आहे. ती मला राखी बांधते. तिचे वडील व भाऊ माझ्यासाठी एक कुटुंब आहे. १७ वर्षांपासून आम्ही एकत्र काम करीत आलो आहोत. त्यामुळे हे माझं विस्तारित कुटुंब आहे.