‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही विनोदी मालिका मागील १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. १६ वर्षात अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली. बरेच जुने कलाकार सोडून गेले आणि नवीन आले. या मालिकेतील काही कलाकारांनी निर्मात्यांवर मालिका सोडताना आरोपही केले होते. त्याची नेहमीच चर्चा असते. काही दिवसांपूर्वी याच मालिकेतील अभिनेत्री पलक सिधवानीने निर्मात्यांवर मानसिक छळ केल्याचा आणि मानधन न दिल्याचा आरोप केल्यानंतर, आता या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी तिच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
अलीकडेच ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना असित कुमार मोदी यांनी पलकच्या आरोपांना फेटाळून लावत म्हटले की, “आम्ही प्रत्येक कलाकाराला वेळेत मानधन देतो आणि त्यांना पुरेसे सुट्टीचे दिवस देखील दिले जातात.” त्यांनी पुढे सांगितले, “जर लोकांनी शो सोडण्यापूर्वी त्यांच्या अडचणी माझ्यासमोर मांडल्या असत्या, तर मला समजले असते. पण शो सोडल्यानंतर असे आरोप करणे योग्य नाही. गेल्या १६ वर्षांपासून बरेच कलाकार आमच्याबरोबर आहेत, आणि त्यांना कधीही कोणतीही अडचण आली नाही,” असे त्यांनी सांगितले.
पलकच्या आरोपांविरोधात त्यांनी कायदेशीर कारवाई सुरू केली असल्याचेही मोदी यांनी सांगितले. सेटवर शिस्त राखण्यासाठी शोमध्ये कडक नियम पाळले जातात असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “जर तुम्ही एखाद्या संस्थेसाठी काम करत असाल, तर तुम्हाला दुसऱ्या कामाची परवानगी मिळेल का? तसेच, आमच्याकडे काही विशिष्ट नियम आहेत. आम्हाला महिन्यात २६ भागांचे शूटिंग करायचे असते,” असित कुमार मोदी यांनी नमूद केले.
त्यांनी पुढे सांगितले की, “पाच-सहा वर्षे काम केल्यानंतर असे आरोप करणे दु:खदायक आहे. जर आमच्या सेटवरचे वातावरण खरोखरच अशांत असेल, तर कोणीही इथे वर्षभरही काम करू शकणार नाही.” हे सांगताना त्यांनी अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि क्रू मेंबर्स जे वर्षानुवर्षे या शोसाठी काम करत आहेत आणि ज्यांच्या या शोबद्दल कोणत्याही तक्रारी नाहीत उदाहरण त्यांचे उदाहरण दिले.
काय म्हणाली होती पलक सिधवानी?
यापूर्वी पलक सिधवानीने शोच्या निर्मात्यांनी तिने शो सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यावर तिला अन्यायकारक वागणूक दिली. असे आरोप केले होते. निर्मात्यांनी तिच्यावर करार भंग केल्याचा आरोप केला आणि तिला तिचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट करण्याची धमकी दिली. असा आरोप पलकने केला होता, तिने म्हणाली होती की, “माझी तब्येत खराब असल्याचे सांगूनही मला १२ तास शूटिंगसाठी भाग पाडण्यात आले.” पलकने असित कुमार मोदींनी तिचे मानधन थकवल्याचे आरोप करत सेटवरचे कामकाज टॉक्सिक असल्याचे सांगितले.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ निर्मात्यांवर आरोप करणारी पलक हा पहिली अभिनेत्री नसून याआधी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री यांनीही असित मोदी यांच्यावर मानसिक छळाचा आरोप करत पोलीस तक्रार दाखल केली होती. तसेच, तारक मेहता यांची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनीही मानधन थकविल्याचा आरोप करत असित कुमार मोदी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली होती.