Tarak Mehta Fame Mandar Chandwadkar Wife : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील विनोदी तसेच कौटुंबिक मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ‘गोकुलधाम’ सोसायटीच्या एकमेव सेक्रेटरीची तसेच शिक्षकाची भूमिका मराठमोळा अभिनेता मंदार चांदवडकर साकारत आहे. ‘तारक मेहता…’ मालिकेमुळे घराघरांत त्याचा एक वेगळा चाहतावर्ग तयार झाला आहे. पण, फार कमी जणांना माहितीये की, मंदारची खऱ्या आयुष्यातली पत्नी सुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.
मंदार चांदवडकरच्या पत्नीचं नाव स्नेहल असं आहे. ती सुद्धा छोट्या पडद्यावर सक्रिय असते. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सोशल मीडियावर स्नेहल कायम सक्रिय असते. ‘१०:२९ की आखरी दस्तक’, ‘नवे लक्ष्य’ अशा मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे. आता स्नेहल एका नव्या रुपात आणि एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गेल्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. १६ डिसेंबरपासून अभिनेत्री मृणाल दुसानिसची मध्यवर्ती भूमिका असलेली ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याच मालिकेत स्नेहल महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
स्नेहलच्या भूमिकेचं नवा मंजुषा सावंत असं आहे. “तोंडावर गोड पण आतून कारस्थानी, पैशाचा हव्यास असणारी पण, मोठी कंजूस” अशा मंजूषाचं पात्र मालिकेत स्नेहल साकारत आहे. याबद्दल अभिनेत्री सांगते, “नमस्कार मी स्नेहल मंदार…आणि मी तुम्हाला भेटायला येतेय मंजू या भूमिकेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत मी ‘मंजू’ ही भूमिका साकारतेय. आमच्या या मालिकेत अनेक कलाकारांच्या वैविध्यपूर्ण भूमिका आहेत. त्यातली ही मंजू आपल्या कुटुंबासह तिच्या दादाच्या घरी राहत असते. थोडक्यात खूप आंबट, गोड तिखट अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे ही मालिका नक्की बघा.”
हेही वाचा : Video : पॅकअप होताच मृणाल ठाकूरचा आनंद गगनात मावेना, ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘पीलिंग्स’ गाण्यावर रील करत केली धमाल
दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका दररोज सायंकाळी ७ वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे आणि विजय आंदळकर या कलाकारांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत.