‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. आता एका वेगळ्याच कारणामुळे गेले काही दिवस या मालिकेकडे लक्ष वेधले गेले आहे. ‘मिसेस रोशन सिंह सोढी’ ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी तिने केलेले आरोप फेटाळले. आता या मालिकेत आत्माराम भिडे यांची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकरने असित मोदींची बाजू घेतल्याने जेनिफरने नाराजी व्यक्त केली आहे.
जेनिफरने असित मोदींबरोबरच प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात लैंगिक छळ केल्याबद्दलची तक्रार दाखल केली होती. “असित मोदीने अनेकदा माझ्याबद्दल लैंगिक टिप्पणी केली आहे. एकदा तर त्यांनी सर्वांसमोर माझ्यावर लैंगिक टिप्पणी करत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला होता,” असे तिने ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. पण या तक्रारीनंतर या मालिकेतील ‘आत्माराम भिडे’ म्हणजेच मंदार चांदवडकरने निर्मात्यांची बाजू घेतली. त्यावरून आता जेनिफरने राग व्यक्त केला आहे.
जेनिफर मिस्त्रीने ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मंदार चांदवडकरही एक पुरुष आहे. तो पुरुष असल्याने तो दुसऱ्या पुरुषाविरोधात का बोलेल! तो असित मोदी सांगतील तेच करतो. असितसाठी तो काहीही करू शकतो. काल मला एका सहकलाकाराचा फोन आला होता. तो मंदारला ४५ मिनिटे शिवीगाळ करत होता. मला आता या सगळ्याची अजिबात पर्वा नाही.”
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कोणत्या अभिनेत्रीशी तुझे याबाबत बोलणे झाले का, असं विचारल्यावर ती म्हणाली, “काही दिवसांपूर्वी मला एक-दोन जणांचे फोन आले होते. असे करू नको, म्हणून ते माझी समजूत घालत होते. या मालिकेवर अनेकांचे पोट असल्याचेही त्यांनी मला सांगितले. पण त्यावर मी त्यांना सांगितले की, मला ही मालिका थांबवायची नाही, कारण या मालिकेने २०० लोकांच्या घराची चूल पेटते. पण माझ्या बाबतीत जे घडले त्याला फक्त निर्माता जबाबदार आहे. सध्या मी एका सहकलाकाराच्या संपर्कात आहे. मी त्याचे नाव घेणार नाही. कालही त्याच्याशी दीड तास चर्चा झाली. तो म्हणाला की, मी जे करत आहे ते योग्य आहे.” आता जेनिफरचे हे बोलणे चर्चेत आले आहे.