टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. मालिकेत असलेली सोसायटी व त्यातील सर्व पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. शिवाय ही मालिका नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच आता ही मालिका पुन्हा चर्चेत आली आहे, कारण मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी प्रेक्षकांना मालिकेत नवीन काहीतरी पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
‘इंडियन एक्प्रेसने’ शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असित मोदी याबद्दल बोलताना दिसत आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेबद्दल बोलताना गोकुळधाम सोसायटीमधील डी विंगमध्ये असलेल्या बाल्कनीकडे इशारा करत ते म्हणाले, “या बाल्कनीत लवकरच एक नवीन जोडपं राहायला येणार आहे.” रामनवमीनिमित्तच्या एपिसोडमध्ये सोसायटीमध्ये नवीन कलाकारांची, एका नवीन कुटुंबाची एन्ट्री होणार आहे.
पुढे ते म्हणाले की, “या नवीन कलाकारांच्या एन्ट्रीमुळे कथेत रंजक वळण येणार असून ही जी बाल्कनी आहे तीसुद्धा लवकरच एक प्रसिद्ध बाल्कनी म्हणून ओळखली जाईल, कारण ज्या कलाकारांची एन्ट्री होणार आहे ते खूप गोड आणि मुरलेले कलाकार आहेत. फक्त यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. पण, नक्कीच गोकुळधाम सोसायटीमध्ये अजून एका कुटुंबाचं आगमन होणार आहे.”
मालिकेत गेल्या पाच वर्षांपासून दया भाभी पाहायला मिळत नसून प्रेक्षक पुन्हा दया भाभीला पाहण्यासाठी आतुर आहेत आणि यामुळे आता या व्हिडीओखाली प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने व्हिडीओखाली कमेंट करत म्हटलंय की, “आधी दया भाभीला मालिकेत परत आणा, मग नवीन कुटुंबाला दाखवा सर.” आता दया भाभी मालिकेत पाहायला मिळत नसल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत, त्यामुळे प्रेक्षक मालिकेत दाखवल्या जाणाऱ्या कथानकाला कसा प्रतिसाद देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ ही मालिका सुरू असून या मालिकेत नेहमीच विनोदासह सामाजिक विषयांवर भाष्य करण्यात आलं आहे. शिवाय या मालिकेत नेहमीच सर्व सण आनंदाने व उत्साहात साजरे केले जातात; तर मालिकेतील पात्रांमध्ये असणारं ऑनस्क्रीन बॉण्डिंग, त्यांची मैत्री हे सगळं प्रेक्षकांना आपलंसं वाटतं आणि म्हणूनच मालिकेतून मोठ-मोठ्या कलाकारांनी एक्झिट घेतली असतानाही प्रेक्षकांनी मालिकेवरचं प्रेम कायम ठेवलं आणि आजही प्रेक्षकांचा तसाच प्रतिसाद मालिकेला मिळत असल्याचं पाहायला मिळतं.