‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. मागच्या जवळपास १२-१३ वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोचे लाखो चाहते आहेत. विशेष म्हणजे एवढ्या वर्षांत या कार्यक्रमाची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. काही वर्षांपूर्वीच या शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीने अचानक शो सोडला. प्रेग्नन्सी लिव्हनंतर दिशा पुन्हा शोमध्ये परतेल अशी प्रेक्षकांना आशा होती मात्र ती अद्याप परतलेली नाही. दिशा वकानी शोमध्ये परतणार अशा चर्चा अनेकदा होताना दिसतात. पण आता ती शोमध्ये कधीच परतणार नसल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पूर्वी या शोमध्ये तारक मेहता ही भूमिका साकरणारे शैलेश लोढा यांच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शैलेश लोढा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी एक शायरी लिहिली आहे आणि याला शोचे चाहते शैलेश लोढा यांनी असित मोदी यांच्यावर निशाना साधल्याचं म्हणत आहेत. अर्थात शैलेश लोढा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही किंवा थेट काही वक्तव्य केलेलं नाही. पण त्यांच्या या पोस्टकडे दिशा वकानी शोमध्ये कधीच परतणार नाही याचा इशारा असल्याचं मानलं जात आहे. आपल्या पोस्टमध्ये शैलेश लोढा यांनी लिहिलं, “औरों के हक़ का जोड़ा सब उसने, किसी के मन से जुड़ कर नहीं देखा, इस बात से ही फितरत पता चलती है उसकी जिसने भी उसे छोड़ा, मुड़ कर नहीं देखा”

आणखी वाचा- Photos – परदेशात रमली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील आत्माराम भिडेची लेक; स्वत:साठी खरेदी केलं आलिशान घर

शैलेश लोढा यांच्या शायरीतील शेवटची ओळ खूपच काही बोलून जात असल्याचा दावा चाहत्यांनी केला आहे. सोशल मीडिया युजर्सचं म्हणणं आहे की ही ओळ असित मोदी यांच्यासाठी आहे. कारण मागच्या काही महिन्यामध्ये ‘तारक मेहता’च्या अनेक कलाकारांनी शो सोडला आहे. तसेच ज्यांनी हा शो सोडला आहे त्यातील कोणीच परत आलेलं नाही. अगदी शैलेश लोढा यांनीही काही महिन्यांपूर्वीच हा शो सोडला आहे. त्यांच्या जागी आता सचिन श्रॉफ यांना कास्ट करण्यात आलं आहे. शैलेश यांच्या या पोस्टनंतर, आता दिशा वकानी शोमध्ये कधीच परतणार नाही असा अंदाज चाहते लावताना दिसत आहेत.

आणखी वाचा- ‘तारक मेहता…’ फेम शैलेश लोढांचं राजू श्रीवास्तव यांच्याशी होतं खास नातं, म्हणाले “त्यांचा नंबर मी…”

दरम्यान दिशा वकानी मागच्या ३ वर्षांपासून या शोमध्ये दिसलेली नाही. प्रेग्नन्सी लिव्हवर गेलेली दिशा वकानी शोमध्ये कधी परतणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण आता दिशा वकानी दोन मुलांची आई झाली आहे. मानधनाच्या मुदद्यावरून मेकर्सशी वाद झाल्याने दिशाने शोमध्ये परतण्यास नकार दिल्याचंही बोललं जात. मात्र चाहते आजही दिशा शोमध्ये परतण्याची वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tarak mehta ka ooltah chashmah dayaben will never return shailesh lodha post goes viral mrj