‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत मिसेस रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्री बन्सीवाल निर्मात्यांवर सातत्याने गंभीर आरोप करत आहे. तिने मालिका सोडल्यानंतर निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर आता पुन्हा भाऊ रुग्णालयात असताना निर्मात्यांनी सुट्टी देण्यास नकार दिला होता, असा खुलासा केला आहे. तसेच वडिलांच्या निधनानंतर अवघ्या चार दिवसांतच पुन्हा शूटिंगसाठी बोलावलं होतं, असंही तिने सांगितलं.
हेही वाचा – “मी मायलेकीला सोडलं नाही”; गौतमी पाटीलच्या वडिलांचा दावा; म्हणाले, “मी पुण्यात असताना…”
भावाच्या निधनाबद्दल सांगताना जेनिफरला अश्रू अनावर झाले. भाऊ नागपूरमध्ये रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना ती निर्माता ती सोहेल रमाणीकडे सुट्टी मागण्यासाठी गेली होती. पण सोहेल तिच्यावर ओरडला आणि त्याने सुट्टी देण्यास नकार दिला होता. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत जेनिफर म्हणाली, “माझा भाऊ व्हेंटिलेटरवर होता, तेव्हा मी निर्माता सोहेल रोमानीकडे सुट्टी मागितली व मला दोन दिवसांसाठी नागपूरला जावं लागेल, असं म्हटलं. पण त्याने मला शूट सोडून जाऊ देण्यास नकार दिला. मी त्याला म्हटलं, ‘तू काय बोलतोय, ते तुला समजतंय का? माझा भाऊ व्हेंटिलेटरवर आहे. त्याचं केव्हाही निधन होऊ शकतं, असं डॉक्टरांनी सांगितलंय.” नंतर निर्मात्यांनी जाऊ दिल्याचं जेनिफरने सांगितलं.
हेही वाचा – शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता, ‘या’ देशात होणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप
जेनिफर पुढे म्हणाली, “सुदैवाने भावाच्या निधनानंतर मला लगेच शूटवर बोलावलं नाही. कारण त्यांनी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर ४ दिवसांनी मला कामावर बोलावलं होतं. भावाच्या निधनाच्या वेळी असित मोदीने माझं पेमेंट कापण्यास नकार दिला होता, मी शूटवर नसतानाही मला पैसे दिले होते. पण, जेव्हा मी माझ्या भावाच्या निधनानंतर परत आल्यावर सोहेल मला त्यावरून सारखा बोलायचा. ‘तुझा भाऊ मेला, तेव्हा आम्ही तुला काम न करता पैसे दिले,’ असं तो म्हणायचा.”