आजपासून नव्या वर्षाला सुरुवात झालं आहे. २०२३ला निरोप देऊन २०२४चं जल्लोषात स्वागत झालं आहे. यानिमित्ताने कलाकार मंडळी चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. तसेच सकारात्मक आणि आशावादी राहण्याचा सल्ला देत आहेत. अशाच आशयाचा व्हिडीओ ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील आत्माराम भिडे म्हणजेच अभिनेते मंदार चांदवडकर यांनी केला होता. पण हा व्हिडीओ मराठीत नसल्यामुळे एका चाहत्याला ते खटकलं. याच चाहत्याला मंदार चांदवडकर यांनी चांगलंच उत्तर दिलं.

“टाटा बाय बाय २०२३ आणि २०२४चं स्वागत आहे. तुम्हा सर्वांना खूप आनंदी, समृद्ध, प्रगतीशील आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी नवं वर्ष जावो, यासाठी शुभेच्छा,” असं लिहित अभिनेते मंदार चांदवडकर यांनी काल (३१ डिसेंबर) व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते हिंदीतून म्हणाले होते, “नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहात? आज ३१ डिसेंबर आहे. २०२३चा अखेरचा दिवस आहे. उद्यापासून नवं वर्ष सुरू होणार आहे. फक्त मी आठवण करून देण्यासाठी हा व्हिडीओ करत आहे. जे कोणी विचार करत आहेत, नवीन वर्षापासून डाएट सुरू करणार, जीम सुरू करणार, चालायला जायला सुरू करणार. तर मित्रांनो उद्या नवं वर्ष आहे, १ तारीख आहे आणि सोमवार पण आहे. असा मुहूर्त पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे जे काही तुम्ही ठरवलं आहे, ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे. तर कामाला लागा. आज जितका टाइमपास आणि चीट करायचं आहे तेवढं करा. उद्यापासून तुम्हाला कामाला लागायचं आहे. हे आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरीचा सल्ला आहे. काळजी घ्या.”

हेही वाचा – Video: लग्नाच्या ५ दिवसाआधी अरबाज खानने पत्नी शुराला फिल्मी स्टाइलमध्ये केलं होतं प्रपोज, व्हिडीओ व्हायरल

हाच व्हिडीओ हिंदीत केल्यामुळे एका चाहत्याला खटकलं. तो चाहता म्हणाला, “हे मराठीत पण छान वाटलं असतं दादा. पण तुम्ही मराठीत नाही बोलू शकत मराठी असून यापेक्षा जास्त वाईट काय असू शकत. फक्त कामासाठी आपली मराठी अस्मिता विसरतोय आपण व्वा…माझी सर्वात आवडती भूमिका तुमची होती. पण आता नाही, खरंच दादा.” चाहत्याच्या याच प्रतिक्रियेवर अभिनेते मंदार चांदवडकर स्पष्ट बोलले. ते म्हणाले, “एक सांगू का, मला पण मराठी असल्याचा अभिमान आहे. पण भारतामध्ये सर्वांना समजावं म्हणून हिंदीत बोललो आणि तुम्ही मालिका बघत असालं तर मी बरेच डायलॉग मराठीतूनच बोलतो. त्यामुळे विनंती आहे की, नुसत्या एका व्हिडीओवरून जज करू नका. जय महाराष्ट्र.”

हेही वाचा – Video: ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी नवं वर्षाचं ‘असं’ केलं स्वागत, अभिनेत्री म्हणाली, “सर्व काही…”

दरम्यान, गेली १५ वर्ष ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ प्रेक्षकांचं मनोरंजन करत खळखळून हसवत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर अजूनही प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. मालिकेतील कलाकारांना त्यांच्या भूमिकांमुळे नवी ओळख मिळाली आहे. त्यापैकी एक म्हणजे आत्माराम तुकाराम भिडे अर्थात मंदार चांदवडकर. जेठालाल, तारक मेहता यांच्याप्रमाणेच भिडे यांचाही एक वेगळा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

Story img Loader