‘सोनी टीव्ही’वरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका गेल्या १६-१७ वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. सुरुवातीपासून या मालिकेवर प्रेक्षकही भरघोस प्रेम करताना दिसत आहेत. आजही मनोरंजनासाठी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका घरोघरी आवर्जुन पाहिली जातेय. या मालिकेची जितकी चर्चा असते, तितकीच चर्चा मालिकेतील कलाकारांची असते. या मालिकेतील आत्माराम भिडे म्हणजे अभिनेते मंदार चांदवडकर सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. त्यांचे डान्स व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात. नुकताच मंदार चांदवडकर यांनी पत्नीबरोबरचा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे; जो सध्या व्हायरल होतं आहे.
अभिनेते मंदार चांदवडकरांनी डान्स व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “माझ्या चुलत बहिणीच्या लग्नात मजेशीर डान्स. स्नेहलने गाण्याची निवड केली आहे आणि हा सुंदर डान्स माझा मित्र प्रसाद मेस्त्रीने दिग्दर्शित केला आहे.”
या व्हिडीओमध्ये मंदार चांदवडकर पत्नी स्नेहल चांदवडकर यांच्याबरोबर ‘छबीदार छबी’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यावेळी मंदार यांनी शेरवानी घातली असून स्नेहल भरजरी लेहेंग्यामध्ये पाहायला मिळत आहेत. दोघांचा हा जबरदस्त डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
मंदार चांदवडकर आणि त्यांच्या पत्नीच्या डान्सवर व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “अरे व्वा…मस्त…जबरदस्त.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, डान्स खूप मस्त केला. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “भिडे भाऊ हे चांगलं नाहीये. तब्बुला बोलता आणि तुम्ही काय करता?” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं की, अप्रतिम भिडे मास्तर.
दरम्यान, मंदार चांदवडकर यांची पत्नी स्नेहल चांदवडकरदेखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकेत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘नवे लक्ष्य’, ‘१०.२९ की आखिरी दस्तक’, अशा काही मालिकांमध्ये स्नेहल चांदवडकर यांनी काम केलं आहे. सध्या स्नेहल चांदवडकर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये पाहायला मिळत आहेत. या मालिकेत त्यांनी मंजूचं पात्र साकारलं आहे.