अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटात ती नुकतीच मुख्य भूमिकेत दिसली होती. सुबोध भावेंबरोबर तिने चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. याबरोबरच ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतही मुक्ताच्या भूमिकेत दिसली होती. तिच्या इतर भूमिकांप्रमाणेच या मालिकेतील तिची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस आली होती. काही दिवसांपूर्वी तेजश्री या मालिकेतून बाहेर पडली आहे. आता एका मुलाखतीत तिने आपल्या हक्काचे ब्रेक गरजेचे असतात असे म्हटले आहे. अभिनेत्रीने नेमकं काय म्हटले आहे, हे जाणून घेऊयात.
आपण खूप गोष्टी…
तेजश्री प्रधानने ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या पॉडकास्टमध्ये नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी तिला विचारण्यात आले की, तुझ्यामध्ये स्थैर्य जाणवतं; तर हे स्थैर्य मिळवण्यासाठी तू काही वेगळे प्रयत्न करतेस का? यावर बोलताना तेजश्री प्रधानने म्हटले, “नाही, माझं आयुष्य त्यासाठी पुरेसं असतं. ते मला कमाल रोलर कोस्टर राइड देत राहतं आणि तुम्ही जेवढं रोलर कोस्टर राइडवर बसता, तेवढे तुम्ही शांत होत जाता; त्यामुळे मला वाटतं की तो फंडा आहे.”
सध्या आयुष्यात काय चढ-उतार येत आहेत? अशा आशयाचा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तेजश्रीने म्हटले, “सुदैवाने काहीच नाही. आता सध्या खूप शांत आणि कमाल आयुष्य चालू आहे. नुकताच माझा एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मी माझ्या नवीन प्रोजेक्ट व संधींसाठी खूप उत्सुक आहे. या व्यतिरिक्त सध्या मी माझ्या स्पेसमध्ये आहे आणि मला स्वत:बरोबर वेळ घालवायला आवडतो. आपण काम करत राहतो, खूप बिझी आयुष्य जगत असतो. आताच्या तरुण पिढीबाबतसुद्धा, दुर्दैवाने हे सत्य आहे की काम करताना स्वत:च्या आयुष्याशी आपलं प्रत्येक दिवशी, प्रत्येक मिनिटाला एक डील चालू असतं. आपण विचार करतो की आता मला वेळ नाहीये, मग मी खाणं टाळते. अमुक एखाद्या दिवशी व्यायामाला वेळ नाहीये तर आज व्यायाम करत नाही, कामाला निघते. कामाला प्राथमिकता देताना आपण खूप गोष्टी करत नाही, टाळतो. ते करणं आपल्या आरोग्यासाठी छान नाहीये आणि मला असं वाटतं की, हे जे हक्काचे ब्रेक्स आहेत ना, ते तुमच्या आयुष्यात आले पाहिजेत; तर आताच्या घडीला मी त्या ब्रेकवर आहे.”
“मला वाटतं की बाहेरच्या जगाच्या मी ब्रेकवर आहे, पण मी आता माझी काळजी घेत आहे. सध्या मला असं वाटतंय की, सगळ्या गोष्टी मला आता इतक्या छान पद्धतीने स्वत:साठी करायच्या आहेत, या मोडवर मी आता आहे”, असे म्हणत तेजश्रीने सध्या स्वत:वर लक्ष देत असल्याचे म्हटले आहे.