अभिनेत्री तेजश्री प्रधान व अभिनेता राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुक्ता, सागर, सई, सावनी अशा अनेक व्यक्तिरेखा असलेली ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. त्यामुळे मालिका टीआरपीच्या शर्यतीत देखील अव्वल स्थानावर आहे. सध्या मालिकेला एक वळणं आलं आहे.
एकाबाजूला मुक्ताचा साखरपुडा ठरला असून दुसऱ्या बाजूला तिच्या लाडक्या सईवर संकट ओढावलं आहे. कालबाह्य झालेलं कफ सिरप दिल्यामुळे सईची प्रकृती बिघडली आहे. अशावेळी मुक्ताचं सईकडे लक्ष जातं. तेव्हा तिच्या तोंडातून फेस येताना दिसतो. त्यामुळे मुक्ता तिला तातडीने रुग्णालयात दाखल करते. यावेळी रुग्णालयात सईवर उपचार करण्यासाठी एका फॉर्मवर तिच्या आई-वडिलांची सही पाहिजे असते. त्यामुळे मुक्ता सागरला फोन करते. पण सागर नशेत झोपला असतो. शेवटी मुक्ता सईची आई सावनीचा शोध घेते. पण सावनीचा पती तिला पाठवण्यास नकार देतो आणि अखेर मुक्ता स्वतः त्या फॉर्मवर सही करते. यानंतर सईवर उपचार सुरू होतात.
अशात दुसरीकडे मुक्ताच्या साखरपुड्याची तयारी झालेली असते. सर्व पाहुणे मंडळी देखील तिच्या घरी आलेले असतात. पण यावेळी मुक्ताच्या घरी पोलीस दाखल होतात. सागरने मुक्ता विरोधात सईच्या अपहरणाची तक्रार केल्यामुळे पोलीस गोखलेंच्या घराची झाडाझडती घेतात. यावेळी कालबाह्य झालेल्या कप सिअरपची बॉटल गोखलेच्या कचऱ्याच्या डब्यात सापडते. त्यामुळे मुक्ताच्या आई-वडिलांना अटक केली जाते.
हेही वाचा – Video: प्रसाद ओक स्वप्नील जोशीला देत होता वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पण घडलं भलतंच, पाहा व्हिडीओ
या सर्व प्रकारामुळे मुक्ताचा साखरपुडा मोडतो. यानंतर सागरचे वडील मुक्तावरील अपहरणाची तक्रार मागे घ्यायला लावतात. यामुळे मुक्ताचे आई-वडील तुरुंगाबाहेर येतात. तेव्हा त्यांना मुक्ता पुन्हा साखरपुडा मोडल्याचं सांगते. हे ऐकून दोघांना धक्का बसतो.
हेही वाचा – “दुर्दैवाने होतं ते…” ‘विनाकारण राजकारण’साठी पुरस्कार मिळाल्यानंतर रुपाली भोसले असं का म्हणाली?
आता या सगळ्या नाट्यानंतर लवकरच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा महाएपिसोड रंगणार आहे. ज्यामध्ये काही महिला सईला तिच्या आईच्या हवाली करण्यासाठी आंदोलनात करताना पाहायला मिळणार आहेत. पण यामुळे सई आई सावनीकडे जाणार का? हे २२ ऑक्टोबरच्या महाएपिसोडमधून स्पष्ट होणार आहे. यासंदर्भातला व्हिडीओ ‘स्टार सीरियल मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ४ सप्टेंबरपासून सुरू झाली. महिन्याभरतच या मालिकेतील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं आहे. तेजश्री प्रधान व राज हंचनाळे व्यतिरिक्त शुभांगी गोखले, अपूर्वा नेमळेकर, संजीवनी जाधव असे बरेच कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.