अभिनेत्री तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जवळपास दोन ते अडीच वर्षांनी तेजश्री पुन्हा एकदा मालिका विश्वात पुनरागमन करणार आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकांद्वारे तेजश्रीला घराघरांत लोकप्रियता मिळाली. आता ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाल्यावर नेटकऱ्यांनी हिंदी मालिकेचा रिमेक आहे असं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल आता तेजश्रीने आपलं मत मांडलं आहे.
नव्या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री तेजश्री प्रधानने अलीकडेच इट्स मज्जाला मुलाखत दिली. यामध्ये अभिनेत्रीला हिंदी मालिकेच्या रिमेक असण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर तेजश्री म्हणाली, “हो, हिंदीचा रिमेक आहे आणि यात काहीच दुमत नाही…ही गोष्ट कोणीही नाकारलेली नाही. पण, कोणीच शब्दश: भाषांतर करत नाही. प्रत्येक भाषेत वेगवेगळ्या भावना असतात. रिमेक असला तरीही तुम्हाला ही मालिका एका नव्या रुपात तुम्हाला पाहायला मिळेल.”
तेजश्री पुढे म्हणाली, “मालिका रिमेक असली तरीही प्रत्येक भाषा आणि संस्कृतीचं आपलं एक वैशिष्ट्य असतं. त्यामुळे रिमेक हा नावाला घेतला जाणारा धागा असतो. त्यापुढची बांधणी ही प्रत्येक माणूस करत आहे. अगदी पहिल्या भागापासून तुम्हाला आमच्या मालिकेतील वेगळेपणा जाणवेल हे मी निश्चितपणे सांगू शकते.”
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ४ सप्टेंबरपासून संध्याकाळी ८ वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तेजश्री प्रधान, राज हंसनाळे आणि अपूर्वा नेमळेकर यांच्या व्यतिरिक्त शुभांगी गोखले, संजीवनी जाधव हे कलाकार सुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारतील.