अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची प्रत्येक मालिकेतील भूमिका ही हीट ठरली आहे. मग ती जान्हवी असो किंवा शुभ्रा. तिच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. सध्या तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील तेजश्रीची मुक्ता ही भूमिका प्रेक्षकांना अल्पावधीतच पसंतीस पडली आहे. त्यामुळे मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहे.
४ सप्टेंबर २०२३ पासून सुरू झालेली तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपी यादीतही मालिका अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील ट्वीस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. सध्या तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेबरोबरचं ‘पंचक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानिमित्ताने ती विविध ठिकाणी मुलाखत देताना दिसत आहे. नुकतीच तिने ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीने तिच्यासाठी टेलीव्हिजन व मालिका किती महत्त्वाचं आहे? हे सांगितलं.
हेही वाचा – “हा महिना माझ्यासाठी…”, अभिनेत्री तेजश्री प्रधानने सांगितली आईच्या निधनानंतरची परिस्थिती; म्हणाली…
या मुलाखतीमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधानला विचारण्यात आलं की, मालिकेना तू किती गंभीरतेने घेतेस आणि तू त्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघतेस? तुझ्या आयुष्यात मालिकेला किती महत्त्व आहे? यावर तेजश्री म्हणाली, “मी खूप गंभीरतेने घेते. माझं काम तर मी गंभीरतेने घेतेच आणि मालिका तर विशेष मी गंभीरतेने घेते. मला असं वाटतं, मालिकेचा जो अर्धातास तुमच्या वाट्याला आलाय. ते प्रबोधन घडवतं असतं. तुम्ही जे करत असता ते पाहणारे लोक असतात. तो लोकांचा नित्यक्रम असतो. तुमच्या अख्ख्या दिवसांच काम लोकांच्या २४ तासातल्या अर्ध्या तासांचा नित्यक्रम असतो. हेच तुम्हाला गंभीरतेने घ्यायला भाग पाडतं. म्हणजे एक अलीकडेचं घडलेलं छोटं उदाहरण सांगते, सहाय्यक दिग्दर्शकाने एका सीनमध्ये टॉवेल हवा होता म्हणून तो घडी वगैरे घालून ठेवला होता. तर आमचे दिग्दर्शक लगेच बोलले कशाला घडी घातली आहेस? घरात असा ठेवतो का? ती घडी उघड. तिने तो टाकलाय ना, मग तो टाकलेला अवस्थेत असेल. त्यामुळे मालिकेत हिरोइन जरी असली तरी तुमच्या घरची सदस्य दिसणं खूप महत्त्वाचं असतं.”
हेही वाचा – Video: लेकीच्या लग्नातला आमिर खानचा ‘आती क्या खंडाला’ गाण्यावरील डान्स पाहिलात का?, व्हिडीओ झाला व्हायरल
“टेलीव्हिजन माध्यम मी खूप गंभीरपणे घेते. तिथे नैसर्गिक काम करणं, श्रद्धेने काम करणं गरजेचं असतं. तिथे काम करताना हिरोइन वाला कुठे अविर्भाव नसतो. बाहेर गेल्यानंतर पटकन कोणीतरी म्हणतं, तू आम्हाला घरची मुलगी वाटतेस किंवा नात वाटतेस. त्यामुळे दिलेल्या वेळेला रोजच्या दिवशी त्यांच्या (प्रेक्षकांच्या) घरात प्रवेश करायचा आहे या जाणीवेने काम केलं जातं,” असं तेजश्री प्रधान म्हणाली.