‘होणार सून मी या घरची’मधील जान्हवी असो, ‘अग्गंबाई सासूबाई’मधील शुभ्रा किंवा ‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ता अशा अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) हिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रेमाची गोष्ट या मालिकेतून बाहेर पडली आहे. अभिनयाबरोबरच तेजश्री तिच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखली जाते. अभिनेत्री विविध विषयांवर तिची मते मांडताना दिसते. आता तेजश्री प्रधानने नुकतीच ‘मिरची मराठी”च्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत, अभिनेत्रीने सतत सकारात्मक, आनंदी राहण्यावर वक्तव्य केले आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान काय म्हणाली?
सतत सकारात्मक, आनंदी राहण्याविषयी जे सातत्याने बोलले जाते, त्यावर तेजश्री प्रधानने म्हटले की, मला हल्ली वाटायला लागलंय की सकारात्मकतेच्या नादी इतकेही नका लागू की आपण आपल्यावरच अन्याय करायला लागू. रडावंसं वाटत असेल, तर रडलं पाहिजे. देवानं आपल्याला आज नवरस दिलेले आहेत. मग, आपण त्यातील एकाच रसाचा झेंडा कशाला मिरवत फिरतोय? आनंदी राहणं छान आहे; पण आनंदी राहण्यासाठी बाकीचे रससुद्धा आहेत ना. एखाद्या व्यक्तीला २४ तास आनंदी राहायला सांगितलं, तर आपल्यालाच ती व्यक्ती खोटी वाटायला लागते. त्यामुळे आपल्याला राग येणं, आपण पटकन प्रतिक्रिया देणं, एखाद्या गोष्टीचं वाईट वाटणं, रडू येणं यासुद्धा भावना आहेत. त्यामुळे माझं कायम म्हणणं असतं की, रडणं चुकीचं नाहीये. रडलं पाहिजे. कारण- तुम्हाला मोकळं व्हायचीसुद्धा गरज आहे.
आपण विभक्त कुटुंबात राहतो. आपल्या आजूबाजूला कितीही लोकं असले तरी आपण एकटे असतो. कम्फर्ट लेव्हल व मनातलं सगळं शेअर करायला खरंच हक्काचं माणूस आहे का? हे आपल्याला माहीत नसतं. ते नसेल, तर त्यात काही वाईट नाहीये. माझा सांगायचा मुद्दा असा आहे की, ते जेव्हा नसतं ना तेव्हा किती काय काय साठत जातं. त्याचं ओझं खूप होतं. मग ते जर तुमच्या डोळ्यांतून येणाऱ्या पाण्यातून बाहेर पडणार असेल, तर तेसुद्धा येऊ दे. फक्त त्याची सवय लावू नका. तुम्ही पीडित म्हणून वावरू नका. मला रडण्याबद्दल आक्षेपच नाहीये. पण, कुठे थांबायचं आहे हे ठरवा आणि रडायची मुभा स्वत:ला तेव्हा द्या, जेव्हा त्यात स्वत:कडून कमिटमेंट घ्या की, हे रडून झालं ना आपल्याला पुन्हा एका रुटिनला लागायचं आहे; जिथे आपण गोष्टींचं कौतुक करणार आहोत. जिथे आपण छान राहणार आहोत. स्वत:ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही २४ तास आनंदात राहण्याची गरजच नाहीये, असं म्हणत माणसानं त्याच्या सर्व प्रकारच्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत, असं म्हटलं आहे.
दरम्यान, तेजश्री प्रधान नुकतीच सुबोध भावेंबरोबर हॅशटॅग तदेव लग्नम या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली होती. त्याबरोबरच प्रेमाची गोष्ट या मालिकेमधील मुक्ता हे पात्र ती साकारत होती. मात्र, अभिनेत्रीने अचानक ही मालिका सोडली. त्यानंतर मोठ्या चर्चा होताना दिसल्या होत्या. आता तेजश्री कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd