नाटक, चित्रपट व मालिका याबरोबरच वेब सीरीजचे महत्वदेखील वाढू लागले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळताना दिसत आहे. जगभरातील विविध पद्धतीचे कन्टेट पाहण्याची संधी प्रेक्षकांना या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून मिळते. आता लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान(Tejashri Pradhan)ने ओटीटीवर का काम केले नाही, यावर एका मुलाखतीत भाष्य केले आहे. अनेक चांगले प्रोजेक्ट तिच्याकडे आल्यानंतरही वेब सीरीजमध्ये काम न करण्याचे काय कारण आहे, हे तिने स्पष्ट केले आहे.

ओटीटीच्या बाबतीत माझं एक ठाम…

तेजश्री प्रधानने नुकतीच ‘मिरची मराठी’च्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने विविध विषयांवर भाष्य केले. तिने साकारलेल्या भूमिका, नाटक, प्रशांत दामले यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव, अशा अनेकविध विषयांवर तिने गप्पा मारल्या. अभिनेता हृषिकेश शेलारच्या शिकायला गेलो एक या नाटकातील कामाचे कौतुक केले. या मुलाखतीत तेजश्रीने नाटक, टेलिव्हिजन व ओटीटी या माध्यमावर मत मांडले. ओटीटीबाबत बोलताना तेजश्रीने म्हटले, “ओटीटीच्या बाबतीत माझं एक ठाम मत आहे. त्यामुळेसुद्धा असेल अजूनपर्यंत एवढे छान प्रोजेक्ट येऊनही मी करू शकली नाहीये. कारण माझी काही मर्यादा, बंधने आहेत. न्यूडिटी, सेक्युअलिटी, हिंसा, हे खरंच प्रत्येक गोष्टीचा भाग असलेच पाहिजेत का? या अट्टाहसाने हल्ली जे केलं जातं ना ते जरा मला थोडं जास्त वाटतंय. त्याच्या शिवायसुद्धा आपण एखादा गोड विषय मांडू शकतोच”, असे म्हणत तेजश्री प्रधानने साधपणाने एखादा विषय लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतो, असे म्हटले आहे.

तेजश्री प्रधान नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमातून व भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. महत्वाचे म्हणजे, तिच्या भूमिकांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळताना दिसते. तिने साकारलेल्या मालिका, चित्रपटातील भूमिका गाजल्याचे पाहायला मिळाले. सध्या ती काय करते या चित्रपटात तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. तिची ती भूमिका प्रेक्षकांना आवडल्याचे पाहायला मिळाले. नुकतीच ती हॅशटॅग तदेव लग्नम या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली होती. सुबोध भावेंबरोबर तिने स्क्रीन शेअर केली होती. आता अभिनेत्री कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे, महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader