अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेत सुरू असलेला सागर-मुक्ताच्या लग्नसोहळ्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. सईच्या प्रेमाखातर लग्नाला तयार झालेल्या सागर-मुक्ताला हळद लागली आहे. आता लवकरच दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. सागर-मुक्ताच्या लग्नासाठी ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन-सायली खास हजेरी लावणार आहेत. याबरोबर लग्नात सावनीची देखील एन्ट्री होणार आहे. सावनीच्या येण्याने बरंच नाट्यही रंगणार आहे. त्यामुळे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार का? याची उत्सुकता आहे. पण दुसऱ्या बाजूला अर्जुन-सायलीच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील एन्ट्रीची चांगलीच चर्चा सुरू आहे.
लग्नाच्या निमित्ताने सागर-मुक्ताचं अर्जुन-सायलीबरोबरचं एक वेगळं नातं पाहायला मिळणार आहे. अर्जुन हा नवरा मुलगा सागरकडून तर सायली मुक्ताकडून आलेली दिसणार आहे. सागर हा अर्जुनचा चांगला आणि खास मित्र दाखवण्यात आला आहे. तर सायली आणि मुक्ताचं नातं हे आश्रमाशी निगडीत आहे. सायलीच्या आश्रमात मुक्ता मोफत उपचार देत होती. त्यामुळेच सायली आणि मुक्ताचं एक वेगळं नातं आहे. याच नात्याने सायली सागर-मुक्ताच्या लग्नाला हजेरी लावणार आहे.
हेही वाचा – अमित भानुशाली तेजश्री प्रधानची आहे जुनी ओळख, तर जुईचं आहे ‘हे’ खास नातं; वाचा यांच्या ऑफस्क्रीन बॉन्डविषयी…
सागर-मुक्ताच्या लग्नात सावनी काही गौप्यस्फोट करणार आहे. त्यामुळे पुढे बरंच नाट्य पाहायला मिळणार आहे. पण यादरम्यान अर्जुन-सायली सागर-मुक्ताला मदत करताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी अर्जुन-सायली म्हणजे अभिनेता अमित भानुशाली आणि अभिनेत्री जुई गडकरीने ‘लोकमत फिल्मी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सागर-मुक्ताच्या लग्नाच्या शूटिंगमध्ये केलेली धमाल आणि अनेक किस्से सांगितले. तसेच दोघांनी जबरदस्त उखाणे घेतले.
सायली म्हणजे जुई भन्नाट उखाणा घेत म्हणाली, “आता हे कोळी आणि गोखल्यांचं लग्न आहे ना त्यासाठी. पैशाचा म्हावरा, रुपयाचा मसाला…सागर आणि मुक्ताच्या लग्नाला यायला आमंत्रण कशाला…” त्यानंतर अर्जुन म्हणजे अमितने मजेशीर उखाणा घेतला. तो म्हणाला, “सागर आणि मुक्ताच्या लग्नाला आलेत सायली-अर्जुन, होहोहो तोंड काय बघताय जेवून जायचंय आहे आवर्जुन.”