‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीत घराघरात पोहोचली आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलाच खिळवून ठेवलं आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या पाचमध्ये स्थान कायम टिकवून आहे.
सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत दिवाळी सुरू असली तरी दुसऱ्या बाजूला गोखले आणि कोळी कुटुंबाचे काही वाद कमी होताना पाहायला मिळत नाहीयेत. सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दोन्ही कुटुंबात वाद होत आहेत. लवकरच मालिकेत मुक्ता-सागरच्या प्रेमाची गोष्ट पूर्ण करण्यासाठी दोन व्यक्ती जबाबदारी घेताना पाहायला मिळणार आहे.
मालिकेच्या आजच्या भागामध्ये सईच्या कस्टडीचा निर्णय होताना पाहायला मिळणार आहे. सई ही तिच्या मम्मी आणि पप्पांची नाही तर मुक्ता अँटीची निवड करताना दिसणार आहे. पण मुक्ता कोर्टाला अशी विनंती करते की, तिचं हसू तिला परत द्या, एवढं नातं माझं सईशी आहे. त्यामुळे सईची कस्टडी नेमकी कोणाला दिली जाते? हे आजच्या भागात स्पष्ट होतं की नाही हे पाहायला मिळेल. तसंच दुसऱ्या बाजूला सायबर क्राईमच्या मदतीने मिहीर निर्दोष असल्याचं मुक्ता समोर येणार आहे.
या सर्व नाट्यानंतर सोसायटीच्या सरचिटणीस पदाची निवडणूक होणार आहे. मालिकेच्या महाएपिसोडमध्ये सरचिटणीस पदाच्या निवडणुकीचा ड्रामा पाहायला मिळणार आहे. नुकताच महाएपिसोडचा एक प्रोमो समोर आला आहे. ‘मराठी टीव्ही इन्फो’ या इन्स्टाग्राम पेजवर ‘प्रेमाची गोष्ट’च्या महाएपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मुक्ता आणि सागर मतदान करताना दिसत आहेत. पण मतदान करत असताना दोघांचा हात मतपेटीत अडकतो. सागर मुक्ताला म्हणतो, ‘तुमच्यात संयमचं नाहीये.’ त्यानंतर मुक्ता एका युक्तीचा वापर करून दोघांचा अडकलेला हात बाहेर काढते. हा सर्व प्रकार मुक्ताचे बाबा आणि सागरचे बाबा पाहत असतात. तेव्हा मुक्ताचे बाबा म्हणतात, ‘मुक्ता आणि सागरचं लग्न लावायलाच हवं.’ यावर सागरचे बाबा म्हणतात, ‘आता यांच्या प्रेमाची गोष्ट आपणच पूर्ण करून दाखवणार.’
हेही वाचा – Video: अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरात देणार गुडन्यूज? प्रेग्नेंसी टेस्टची चर्चा, म्हणाली…
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा हा महाएपिसोड रविवारी १९ नोव्हेंबरला दुपारी १२ आणि रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता सरचिटणीस पदाची निवडणूक मुक्ताचे बाबा जिंकणार की सागरचे बाबा? हे पाहणं आता उत्सुकतेचं असणार आहे.