अभिनेत्री तेजश्री प्रधान व अभिनेता राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने नवनवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं आहे. मुक्ता-सागरची जोडी चांगलीच लोकप्रिय झाली आहे. अशातच आता प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण आला आहे. म्हणजेच सागर सर्वांसमोर पुराव्यानिशी मुक्ताला निर्दोष सिद्ध करणार आहे.
सावनीने मुक्ता-सागरचा संसार मोडण्यासाठी कार्तिकला हाताशी धरून नवी खेळी रचली होती. त्यानुसार कार्तिकने मुक्ताशी जवळीक साधून तिच्यावर बळजबरी केली. मुक्ताने हा प्रसंग सागरच्या घरच्यांना सांगितला, पण यावर घरच्यांचा विश्वास बसला नाही. उलट इंद्राने जावई कार्तिकची बाजू घेत मुक्ताला घराबाहेर काढलं. अशावेळी सागर मुक्ताची काहीच मदत करताना दिसला नाही. पण तो मुक्ताला निर्दोष सिद्ध करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून धडपड करताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – “तुझ्यासारखा तूच चिन्मय…”, नेहा जोशी-मांडलेकरने नवऱ्यासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली…
कार्तिकशी संबंध असलेल्या आरतीला सागर संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. पण आरतीचा सागरचा फोन उचलत नाही. शेवटी सागर एक प्लॅन करतो. कार्तिकचा मोबाइलचा पासवर्ड पाहून त्याचा मोबाइल मुद्दाम पाडतो आणि मग तो दुरुस्त करून आणतो असं सांगून घेऊन जातो. त्यानंतर सागर कार्तिकच्या फोनवर आरतीला भेटण्यासाठी मेसेज करतो. त्यानुसार आरती भेटते. तिला अजिबात कल्पना नसते की, सागरने तो मेसेज केलेला असतो.
आरतीच्या मदतीने सागर कार्तिकविरोधात पुरावे गोळा करतो. कार्तिकच्या विरोधातील पुरावे सर्वांसमोर दाखवून सागर मुक्ताला निर्दोष सिद्ध करतो. अशाप्रकारे सागर सावनी-कार्तिकचा डाव उधळून लावतो.
पण आता निर्दोष सिद्ध झाल्यानंतर मुक्ता काय निर्णय घेणार? सईला घेऊन दिल्ली जाणार की नाही? कार्तिकला काय शिक्षा होणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.