‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ ही गाजलेल्या मालिकांपैकी एक अशी मालिका. या मालिकेनं अडीच वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. शशांक केतकर, तेजश्री प्रधान, रोहिणी हट्टंगडी, सुहिता थत्ते, सुप्रिया पाठारे, लीना भागवत, पौर्णिमा तळवलकर, स्मिता सरोदे, मनोज जोशी, प्रसाद ओके, अतुल परचुरे, समीर चौघुले अशी तगडी कलाकार मंडळी ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत पाहायला मिळाली. ही मालिका अनेक जण आजही तितक्याच आवडीनं पाहतात. या मालिकेत झळकलेल्या मायलेकी जान्हवी व शशिकला यांचं नातं अजूनही तसंच घट्ट आहे. तेजश्री प्रधाननं नुकतीच शशिकला म्हणजेच अभिनेत्री आशा शेलार यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते. ती चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करीत असते. अलीकडेच तेजश्रीनं तिचा सुंदर फोटो शेअर केला होता, ज्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. नुकतीच तेजश्रीनं ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत तिच्या आईची भूमिका साकारणाऱ्या आशा शेलार यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
तेजश्रीनं आशा शेलार यांच्याबरोबर फोटो शेअर करून लिहिलं आहे, “मला तुझा खूप अभिमान आहे आणि तू एक प्रेरणा आहेस.” या फोटोमध्ये तेजश्री लाल रंगाच्या वन पीसमध्ये, तर आशा शेलार पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. तेजश्रीची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.
दरम्यान, तेजश्री प्रधान काही दिवसांपूर्वी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील कलाकारांना भेटली होती. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. २० मार्चला तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील योगेश केळकर (पुरुषोत्तम कोळी), आयुष भिडे (लकी), कोमल सोमारे (स्वाती) व दिग्दर्शक विघ्नेश कांबळे यांना भेटली होती. त्यावेळी त्या पाचही जणांनी खूप एन्जॉय केलं होतं. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडली असली तरी त्या मालिकेतील काही कलाकारांबरोबरचं तेजश्रीचं नातं अजूनही घट्ट असल्याचं पाहायला मिळालं.
तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे. मालिकेला राम राम केल्यानंतर तिनं श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली होती. या आश्रमातील तेजश्रीचे फोटो खूप चर्चेत आले होते. त्याशिवाय ती मैत्रिणींबरोबर निर्सगरम्य वातावरणात फिरताना दिसते. पण, सध्या चाहते तेजश्रीच्या आगामी प्रकल्पाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.