अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. मराठी मालिकाविश्वातील ती आघाडीची अभिनेत्री आहे. तसंच आता तेजश्री मालिकाव्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे. सध्या तेजश्री प्रधान ‘छावा’ चित्रपटात झळकलेला अभिनेत्याबरोबर काम करत आहे.
काही महिन्यांपूर्वी तेजश्री प्रधानने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मधून एक्झिट घेतली. तिच्या या अचानक एक्झिटमुळे चाहत्यांना धक्काच बसला. सोशल मीडियावर तेजश्रीच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. अजूनही चाहते याबाबत प्रतिक्रिया देताना दिसतात. दुसऱ्या बाजूला ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील एक्झिटनंतर तेजश्री कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण, एका फोटोतून तेजश्रीच्या आगामी प्रोजेक्टची हिंट मिळाली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्याबरोबर तेजश्री प्रधान सध्या काम करत आहे. या अभिनेत्याने स्वतः सोशल मीडियावर सेटवर फोटो शेअर केला आहे आणि ही पोस्ट तेजश्रीला टॅग केली आहे. तसंच तेजश्रीनेदेखील अभिनेत्याची पोस्ट तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटात सरसेनापती धनाजी जाधव यांची भूमिका साकारणारा अभिनेता शुभंकर एकबोटेबरोबर तेजश्री प्रधान सध्या काम करत आहे. शुभंकरने सेटवरील कॅमेराचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत लिहिलं आहे, “हॅलो मित्रा…आयुष्यभराचा सर्वात चांगला मित्र…” असं कॅमेराला उद्देशून लिहिलं आहे. तसंच #somethingnew लिहित तेजश्री प्रधानला पोस्ट टॅग केली आहे. शुभंकरच्या शेअर केलेल्या पोस्टमधून तो लवकरच तेजश्रीबरोबर झळकणार असल्याची हिंट मिळत आहे.
दरम्यान, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे. मालिकेला रामराम केल्यानंतर तिनं श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली होती. या आश्रमातील तेजश्रीचे फोटो खूप चर्चेत आले होते. त्याशिवाय ती मैत्रिणींबरोबर निर्सगरम्य वातावरणात फिरताना दिसते. तसंच कलाकारांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील योगेश केळकर (पुरुषोत्तम कोळी), आयुष भिडे (लकी), कोमल सोमारे (स्वाती) व दिग्दर्शक विघ्नेश कांबळे यांना भेटली होती. त्यावेळी त्या पाचही जणांनी खूप एन्जॉय केलं होतं. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडली असली तरी त्या मालिकेतील काही कलाकारांबरोबरचं तेजश्रीचं नातं अजूनही घट्ट असल्याचं पाहायला मिळालं.