Celebrity MasterChef: ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. निक्की तांबोळी, अर्चना गौतम, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया, फैजल शेख या सहाजणांमधून कोण ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा विजयी होणार, हे पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या उपांत्य फेरी (Semi Finale) सुरू आहे. यामध्ये स्पर्धकांना कठीण टास्कचा सामना करावा लागत आहे. हे कठीण टास्क पूर्ण करत दोन स्पर्धक आता अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत, तर निक्की तांबोळीसह चार जणांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे.

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या १ एप्रिलच्या भागात स्पर्धकांना परदेशातील स्ट्रीट फूड करण्याचा टास्क दिला होता. या टास्कमध्ये सहा स्पर्धकांच्या तीन जोड्या करण्यात आल्या होत्या. तेजस्वी प्रकाश-गौरव खन्ना, निक्की तांबोळी-फैजल शेख, अर्चना गौतम-राजीव अडातिया अशा तीन जोड्यांमध्ये हा टास्क खेळला गेला. तेजस्वी प्रकाश-गौरव खन्नाला इंडोनेशिया, निक्की तांबोळी-फैजल शेखला डच आणि अर्चना गौतम-राजीव अडातियाला ब्रिटीश स्ट्रीट फूड बनवायचं होतं.

स्पर्धकांनी बनवलेल्या स्ट्रीट फूडचा आस्वाद घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांना बोलावण्यात आलं होतं. या चाहत्यांना ज्या जोडीचं स्ट्रीट फूड आवडेल, त्या जोडीला चांदीचं नाणं द्यायचं होतं. यावेळी सर्वात जास्त चांदीची नाणी (२७) निक्की-फैजलला मिळाली. पण, तीन परीक्षक विकास खन्ना, फराह खान, रणवीर बरार यांच्याकडील सोन्याचं नाणं मिळणंदेखील तितकंच महत्त्वाचं होतं. विकास खन्नाने त्याच्याकडील सोन्याचं नाणं अर्चना गौतम-राजीव अडातिया यांना दिलं; तर फराह आणि रणवीर बरारने त्यांच्याकडील सोन्याचं नाणं तेजस्वी प्रकाश-गौरव खन्नाला दिलं. या टास्कमध्ये तेजस्वी व गौरवने बाजी मारली आणि अखेर दोघं अंतिम फेरीपर्यंत पोहोचले.

दरम्यान, आता ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या उपांत्य फेरीतील एलिमिनेशन टास्क पार पडणार आहे. अर्चना गौतम, निक्की तांबोळी, राजीव अडातिया आणि फैजल शेख यांच्यामध्ये ब्लॅक अ‍ॅप्रन टास्क होणार आहे. आता या चार जणांपैकी कोण गोल्डन अ‍ॅप्रन मिळवून अंतिम फेरीपर्यंत पोहोचतंय, हे येत्या काळात समजेल.