मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार जोडपे आहेत, ज्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा कायमच सुरू असतात. अशाच काही लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundrra). ‘बिग बॉस १५’ मध्ये या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांचे नाते सुरू झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा होताना पाहायला मिळत आहे. चाहते मंडळी त्यांच्या लग्नासाठी खूपच उत्सुक आहेत. त्यात नुकतंच तेजस्वीच्या आईनेही तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं होतं.
तेजस्वी सध्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ हा शो करत आहे. काही दिवसांपुर्वी अभिनेत्रीची आई शोमध्ये आली होती. तेव्हा त्यांना तेजस्वीच्या लग्नाबद्दल विचारलं होतं. यावेळी तिच्या आईने ‘लवकरच’ असं म्हणत अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल भाष्य केलं होतं आणि अखेर आता तेजस्वी-करण लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाले आहेत. नुकताच दोघांचा हळदी सोहळा पार पडला आहे आणि या हळदी सोहळ्याचे काही खास फोटो त्यांच्या फॅन पेजद्वारे शेअर करण्यात आले आहेत.
तेजस्वी-करण यांच्या एका फॅन पेजकडून शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये तेजस्वीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर करणने आकाशी रंगाचा कुर्ता व त्यावर पांढऱ्या रंगाचा कोट आणि पायजमा परिधान केला आहे. एका तळ्याच्या किनारी त्यांचा हा हळदी सोहळा पार पडल्याचे दिसत आहे. नुकतेच हे हळदी सोहळ्याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. तर आणखी काही फोटोंमध्ये दोघेही पूजा करत असल्याचे दिसत आहे.
“हे अधिकृत करण्याची वेळ आली आहे” असं म्हणत तेजस्वी व करण यांच्या लग्नापुर्वीच्या विधींचे खास फोटो शेअर करण्यात आले आहेत. तेजस्वी आणि करण यांचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. याच चाहत्यांमधील एका फॅन पेजकडून त्यांच्या हळदी व लग्नाआधीच्या विधींचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. मात्र हे फोटो जुने आहेत. दोघांनी गेल्यावर्षी मित्राच्या हळदी समारंभात गोव्यामध्ये काढलेले हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे अनेकांना हे फोटो त्यांच्याच हळदी सोहळ्याचे वाटत आहेत.
दरम्यान, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये नुकतंच फराह खानने तेजस्वीच्या आईला “तिचं लग्न कधी करणार आहे?” असं विचारलं होतं. यावर तेजस्वीची आई म्हणाली होती की, “यंदाच”. आईचं हे उत्तर ऐकून तेजस्वी आश्चर्यचकित झाली होती. नंतर फराहने तेजस्वीला चिडवत तिच्या आईला विचारलं की, “मुलाचं नाव करणचं आहे ना?” यावर तेजस्वीच्या आईने हसत होकार दिला होता. त्यामुळे आता दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.