Laughter Chefs 2: हिंदी टेलिव्हिजनवरील सध्याचा लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’. या सीझनमध्ये काही कलाकार सोडले तर बरेच नवे चेहरे पाहायला मिळत आहे. रुबीना दिलैक, एल्विश यादव, अभिषेक कुमार, समर्थ जुरेल, मन्नारा चोप्रा, अब्दु रोजिक हे सहा जण ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’मध्ये झळकले आहेत. ‘लाफ्टर शेफ्स’च्या पहिल्या सीझनप्रमाणे दुसऱ्या सीझनवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. त्यामुळे टीआरपीदेखील ‘लाफ्टर शेफ सीझन २’ला चांगला मिळत आहे. पण अशातच अब्दू रोजिकने या रिअॅलिटी शोला रामराम केला आहे आणि त्याच्या जागी लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडची एन्ट्री झाली आहे. याचा प्रोमो सध्या चर्चेत आला आहे.
‘लाफ्टर शेफ्स’च्या पहिल्या सीझनमध्ये अली गोनी, अर्जुन बिजलानी, करण कुंद्रा, निया शर्मा, जन्नत जुबैर, राहुल वैद्य, अंकिता लोखंडे, विकी जैन, सुदेश लेहरी, कश्मिरा शहा, कृष्णा अभिषेक असे अनेकजण होते. यांनी हा पहिला सीझन अक्षरशः गाजवला होता. त्यामुळे ‘लाफ्टर शेफ सीझन २’मध्येही हे कलाकार दिसतील अशी अपेक्षा अनेकांची होती. पण, तसं काही झालं नाही. पहिल्या सीझनमधील मोजक्या कलाकारांना घेऊन सीझन दुसरा सुरू झाला. पण, आता पहिल्याच सीझनमधील एका कलाकाराची ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’मध्ये एन्ट्री झाली आहे.
काही दिवसांपूर्वी अब्दू रोजिकची ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’मधून एक्झिट झाली. त्यामुळे निर्मात्यांनी त्याच्या जागी लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा बॉयफ्रेंड करण कुंद्राला विचारणा केली होती. यावेळी करणने पुन्हा एकदा ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’ करण्यास होणार दिला. त्यामुळे आता करण कुंद्राची या सीझनमध्ये जबरदस्त एन्ट्री झाली. प्रोमोमध्ये करण कुंद्राच्या एन्ट्रीमुळे अंकिता लोखंडे, कश्मिरा शहा, कृष्णा अभिषेक, भारती सिंह यांचा आनंद द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर करणला पाहून भारती सिंह भावुक झाल्याचं दिसत आहे. ती म्हणते की, “भोला परत आला.”
दरम्यान, अलीकडेच ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’मध्ये होळी स्पेशल भाग पाहायला मिळाला. ज्यामध्ये निमरित कौर अहलूवालिया, मिका सिंह, साजिद खान, विवियन डिसेना आणि शिल्पा शिरोडकर यांनी पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावली होती. पण आता करण कुंद्राच्या परत येण्याने हा शो आणखी रंगदार होणार आहे. करण आणि तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस १५’मध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तेव्हापासून दोघं एकत्र पाहायला मिळतात. सध्या तेजस्वी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये दिसत आहे.